
उत्तर प्रदेशातील मेरठ हत्याकांडाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. प्रियकरासाठी नवऱ्याची हत्या करणाऱ्या मुस्कानचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत. मुस्कानने नवऱ्याचा काटा काढण्यासाठी तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे अभिनीत ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहिला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
नवऱ्याच्या हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या डोक्यात आले होते, असे आता समोर आले आहे. नवऱ्याचा खून करण्यापूर्वी मुस्कानने यूटय़ूबवर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक कल्पना शोधली होती. या काळात तिने तिचा बॉयफ्रेंड साहिलसोबत ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट आवडल्यानंतर दोघांनीही त्याचा सिक्वेल ‘फिर आयी हसीन दिलरुबा’सुद्धा एकत्र पाहिला होता, असे तिने पोलीस चौकशीत सांगितले आहे. मेरठमध्ये राहणाऱ्या मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत एकत्र राहण्यासाठी तिचा पती सौरभची हत्या करण्याचा कट रचला होता. दोघांनीही सौरभची हत्या करत मृतदेह ड्रममध्ये लपवला व त्यात सिमेंट भरले. पोलीस तपासादरम्यान मुस्कान हिच या हत्येमागील सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे.