लोकसभा निवडणूकीत भाजपने जिंकलेल्या मेरठ मतदारसंघातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मतदारसंघातील तब्बल 240 मतदारांच्या मतदान ओळख पत्रावर असलेला पत्ता प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे. या मतदारांच्या ओळख पत्रावर आरएएच कॉलनी असा पत्ता लिहलेला आहे. मात्र प्रत्यक्षात अशी कोणतीही कॉलनी मेरठमध्ये नसल्याचे समोर आले आहे.
तसेच या मतदारसंघातून दोन बूथवरील तब्बल 80 मतदार असे आहेत ज्यांच्या ओळख पत्रावर पत्त्याच्या उत्तर प्रदेश, झुग्गी, नया असे लिहलेले आहे. तर काही मतदारांच्या ओळख पत्रावर पत्त्याची जागी रिकामी असल्याचे समोर आले आहे. न्यूज लाँड्री या संकेतस्थळाने याबाबतची बातमी दिली आहे. दरम्यान न्यूज लाँड्रीने केलेल्या सर्व्हे नुसार मेरठमधील दोन बूथवरील 27% मतदार हे बनाट असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमधील मेरठ मतदारसंघातून निवडणूकीआधी तब्बल 61,365 मतदारांची नावे काढून टाकण्यात आली होती तर तब्बल एक लाख नावे नव्याने सामिल करण्यात आली होता. या मतदारसंघातून भाजपचे अरुण गोविल यांनी समाजवादी पार्टीच्या सुनिता वर्मा यांचा दहा हजार मतांनी पराभव केला आहे.