
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काकी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची बहीण असल्याचे सांगत एकूण 70 जणांची जवळपास 10 कोटींची फसवणूक करणारी संघ परिवारातील महिला पदाधिकारी मीरा फडणीसचा जामीन यवतमाळ जिल्हा न्यायालायने फेटाळून लावला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी करत आहेत.
अतिरीक्त न्यायाधीश अमित लाऊलकर यांनी मीरा फडणीसचा जामीन फेटाळला. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तसेच न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. मीरा फडणीसला जामीन मिळू नये यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा असल्याने मीरा फडणीसचा जामीन फेटाळण्यात आला.
फसवणूक झालेले 65 संघ परिवारातील
फसवणूक झालेल्यांपैकी 65 जण संघ परिवारातीलच आहेत. केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागार पदी नियुक्ती झाल्याचे सांगत मीरा फडणीसने आणि होशिंगने हा घोटाळा केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने बनावट कार्यक्रम पत्रिका छापून रेल्वे गुंतवणूक परिषदेचे आयोजनही केले होते. त्यानंतर ऐनवेळी हा कार्यक्रम रद्दही केला होता. दरम्यान, मीरा फडणीसविरोधात संघ परिवारातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार यवतमाळ, नागपूरसह विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.