मेधा सोमय्या मानहानी प्रकरण,सत्र न्यायालयात संजय राऊत यांचे अपील; आज सुनावणी

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात दंडाधिकाऱयांनी सुनावलेल्या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गुरुवारी त्यांच्या अपिलाची दखल घेतली आणि शुक्रवारी सुनावणी निश्चित केली.

मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, पण त्याचवेळी शिक्षेला स्थगिती देत अपील दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार संजय राऊत यांच्यातर्फे अॅड. मनोज पिंगळे यांनी दंडाधिकाऱयांच्या निर्णयाविरुद्ध सत्र न्यायालयात अपील दाखल केले. आम्ही सादर केलेले कोणतेच पुरावे दंडाधिकाऱयांनी ग्राह्य धरले नाहीत, असा दावा अपिलातून करण्यात आला आहे. या अपिलाची गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी गंभीर दखल घेतली. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य एडीट करून सादर करण्यात आले. जनहितासाठी केलेले भाष्य बदनामी ठरू शकत नाही, असा युक्तिवाद अॅड. पिंगळे यांनी केला. त्यावर सोमय्या यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. याबाबत न्यायालय शुक्रवारी सुनावणी घेणार आहे.

नेमके प्रकरण काय?

मीरा-भाईंदर पालिकेतील शौचालये बांधकामातील 3 कोटी 90 लाख रुपयांच्या घोटाळय़ाचे वृत्त दै. ‘सामना’ने एप्रिल 2022 मध्ये प्रसिद्ध केले होते. ते वृत्त आणि संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी विधाने केल्याने बदनामी झाली, असा दावा करीत मेधा सोमय्या यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात गेल्या महिन्यात न्यायालयाने निर्णय दिला होता.