मी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकलं. आता माझ्यासाठी काही प्रमाणात अनुपूल परिस्थिती असेल. राज्य शासनाने थेट नियुक्ती योजनेअंर्तगत क्लास वनची पोस्ट दिल्याने ते स्वप्नही पूर्ण झालं. मला मास्तरकीचाही अनुभव आहे. त्यामुळे माझ्या सरावासोबत इतर पॅरालिम्पियन खेळाडू घडविण्यावरही मी भर देणार आहे. आगामी पॅरालिम्पिकमध्ये माझ्यासोबत माझे शिष्यही पदपं जिंकतील, असा निर्धार गोळाफेकीच्या एफ 46 प्रकारात रौप्यपदक जिंकणाऱया मराठमोळय़ा सचिन खिलारीने व्यक्त केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सचिन खिलारीने पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला. आटपाटी तालुक्यातील करगणी गावातील डोंगराच्या अंगाखाद्यांवर खेळून चिकाटी, धैर्य आणि कणखरपणा या नैसर्गिक गुणवत्तेच्या जोरावर सचिन खिलारीने केलेला पॅरिस पॅरालिम्पिकपर्यंतचा थरारक यशस्वी प्रवास त्याच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. मुलाने इंजिनीयर बनावे हे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण घेत असताना अंगात असलेला खेळाचा किडा नेहमीच वळवळायचा. व्हॉलीबॉल, भालाफेक, गोळाफेक अशा मैदानी स्पर्धा गाजविल्या. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली अन् त्याला देशातील सर्वच क्रीडा पुरस्कार मिळालेले पाहून मलाही पॅरालिम्पिक खेळण्याचे स्वप्न पडू लागले. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देऊन शेवटी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत माझे स्वप्न सत्यात उतरले. रौप्यपदक जिंपून मी गोळाफेकीतील चार दशकांचा दुष्काळ संपविला. आता आगामी पॅरालिम्पिकमध्ये पदकाचा रंग बदलण्यासाठी जिवाचे रान करीन, असा निर्धारही सचिन खिलारीने व्यक्त केला. शिवाय आपल्याकडे पॅरा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची कमतरता आहे. त्यामुळे माझ्या या अनुभवाच्या शिदोरीतून मी नव्या दमाचे पॅरा ऑलिम्पियन खेळाडू घडविण्यासाठीही प्रयत्न करेन. त्यामुळे आगामी काळात माझ्यासोबत माझे शिष्यही पदक जिंकतील, असा विश्वासही खिलारीने व्यक्त केला.
आज बाबा हवे होते!
आपल्या पोरानं इंजिनीयर किंवा क्लास वन अधिकारी व्हावं असं माझ्या वडिलांना वाटत होतं. आईला तर मी 1994 सालीच गमावलं होतं. त्यानंतर वडीलच माझे आई अन् बाबा बनले होते, मात्र मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवित असताना गतवर्षी वडिलांचं छत्रही हरपलं. आज मी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. राज्य शासनाने मला ‘क्लास वन’ अधिकारीही बनवलं, पण हे सर्व बघण्यासाठी वडील हयात नाहीत. आज बाबा हवे होते. त्यांची उणीव मला प्रकर्षाने जाणवतेय. – सचिन खिलारी