प्रयोगानुभव – शोध स्वतचा आणि नात्यांचाही

>> पराग खोत

मराठी रंगभूमी सतत नव्याच्या शोधात असते. नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर येत असतात. 2025 या नव्या वर्षात तर हमखास गर्दी खेचणाऱया विनोदी नाटकांपासून गंभीर, आशयघन अशा वैविध्यपूर्ण विषयांच्या नाटकांचे शुभारंभ होताना दिसत आहेत. या मांदियाळीत आता अमरदीप आणि कल्पकला निर्मित ‘मी व्हर्सेस मी’ या नव्या नाटकाचे आगमन झाले आहे. वरकरणी गूढ किंवा सायकॉलिजकल मिस्ट्री वाटणाऱ्या या नाटकात मानवी मनाचे कंगोरे उलगडून दाखविण्याचा हळूवार प्रयत्न केला आहे. त्यामुळे एका वेगळ्या जातकुळीतले नाटक आपण बघायला जातोय याचे भान प्रेक्षकांना असणे आवश्यक आहे.

अनिश दाते नावाच्या तरुणाची ही गोष्ट आहे. आपल्या आईवडिलांमुळे त्याचे बालपण विसकटले आहे. त्यामुळे तो तीच सल, उपेक्षा आणि तीव्र दुःख घेऊन मोठा झाला आहे. नैराश्य, एकाकीपण आणि अपमान यामुळे त्याचा जगण्यातला रस निघून गेलाय आणि म्हणूनच assisted suicide साठी त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. इतर देशात अशी सुविधा (?) आहे तर आपल्या देशात ती का नसावी? असा त्याचा सवाल आहे. हा न्यायालयीन लढा तो हरतो आणि झोपेच्या गोळ्या घेऊन आयुष्य संपविण्याचा प्रयत्न करतो. या घटनेपासून नाटक सुरू होते. पोलीस तपासात काहीही आक्षेपार्ह न सापडल्याने त्याला सोडून दिले जाते खरे, पण आत्महत्या करण्याचा त्याचा निर्णय कायम असतो. अरुणा शानभाग ही एकमेव दुर्मीळ केस वगळता अशी न्यायालयीन परवानगी कोणालाही मिळालेली नाही हे ठाऊक असूनही त्याला पुन्हा लढा द्यायचा असतो. तीव्र दुःखाशी झगडत, पूर्णपणे हार मानण्याच्या उंबरठय़ावर असतानाच, एक रहस्यमय अनोळखी व्यक्ती त्याच्याशी संपर्क साधते आणि त्याला एक अनपेक्षित प्रस्ताव देते – त्याच्या वेदनांपासून सुटकेचा, त्याला हव्या असलेल्या assisted suicide मध्ये मदत करण्याचा. पण त्याबदल्यात त्या अनोळखी व्यक्तीला काय हवे असते?

…आणि इथून खरे नाटक सुरू होते. त्या प्रस्तावानुसार अनिश एका वृद्धाश्रमात स्वयंसेवक म्हणून दाखल होतो. तिथल्या त्याच्या काहीच दिवसांच्या वास्तव्यात त्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि त्याच्यातील बदलांना सुरुवात होते. तिथे त्याचा संवाद सुरू होतो आणि त्याच्या आतली घुसमट बाहेर पडते. योग्य की अयोग्य याचा वैचारिक झगडा तिथे सुरू होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक नवाच दृष्टिकोन अनिशसोबत प्रेक्षकांनाही सापडतो. ही गोष्ट सुरू असतानाच आपल्याला काही अनपेक्षित धक्के बसतात आणि त्यामुळे ती गोष्ट जास्तच इंटरेस्टिंग होत जाते. हे नाटक आयुष्यातील कठीण प्रसंगीही आशा शोधण्याच्या जिद्दीची हृदयस्पर्शी कथा सांगते. मानवी नातेसंबंधांचा हा एक साधा पण प्रभावी शोध आहे. आपण अंधकारमय क्षणांमध्ये असलो, तरीही पुढे जाण्याचा मार्ग असतो आणि आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याची संधी सदैव उपलब्ध असते. नायक अनिशसोबतच इतर पात्रांनाही त्यांचा सुटलेला हात पुन्हा सापडतो आणि हेच या नाटकाचे मर्म आहे.

लेखक दिग्दर्शक संजय जमखंडी यांनी हे नाटक सायकॉलॉजिकल थ्रिलर या मार्गाने नेले आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते. नाटकाचा ओपनिंग शॉट किंवा पहिला अंक संपताना उलगडलेले रहस्य आणि त्याच रहस्याने दुसऱया अंकाच्या शेवटी घेतलेली गिरकी अशा गोष्टी नाटकात खुबीने पेरल्या आहेत. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर आणि हृषीकेश जोशी हे मराठीतले तीन गुणी नट प्रथमच एकत्र आले आहेत. तिघांच्या भूमिकांचा पोत वेगवेगळा असल्यामुळे ते तिघेही आपापल्या क्षमतेनुसार स्वतंत्रपणे प्रसंग खुलवत नेतात. त्यांना चिन्मय पटवर्धन, महेश सुभेदार आणि दिनेश सिंह या सहकलाकारांची साथ लाभते. क्षितिश दाते आणि हृषीकेश जोशी जोरदारपणे नाटक पुढे घेऊन जात असताना शिल्पा तुळसकर मात्र आपल्या संयत देहबोलीतून आणि चेहऱयावरील एक्सप्रेशन्समधून व्हिलचेअरला खिळलेल्या स्त्राrच्या जगण्यातली उमेद छान दाखवतात. त्यांचा रंगभूमीवरील वावर अफलातून. तो कसा, हे प्रत्यक्ष नाटकातच पाहावे. या गोष्टीला साथ मिळते ती उत्तम नेपथ्याची. वेगवेगळ्या ठिकाणी हे नाटक घडत असल्यामुळे नेपथ्य निर्माण हे एक आव्हान होते आणि ते अनुभवी नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी समर्थपणे पेलले आहे असे म्हणावे लागेल. नाटकात दिसणारे काश्मीर हे नेपथ्यकाराच्या सूचक क्लृप्त्यांमुळे अजूनच आकर्षक वाटते. या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी भरत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले यांनी सांभाळली आहे. सहनिर्माती शिल्पा तुळसकर आहेत आणि सूत्रधार आहेत दीपक गोडबोले.

रहस्याची डूब असलेले हे गंभीर आशयाचे नाटक जगण्याचे एक प्रभावी सूत्र मांडते. आपल्याला माहीत असलेल्या अनेक गोष्टी पुन्हा सांगते, पण असे असले तरी निराश, खचलेल्या मनांना एक नवी जाणीव करून देते, जगण्याची ऊर्मी निर्माण करते हे निश्चित. नेहमीच्या पठडीतल्या नाटकांपेक्षा वेगळे काही पाहण्याची इच्छा आणि तयारी असलेल्या प्रेक्षकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

[email protected]