पुन्हा एकदा मराठी पडद्यावर अवतरणार दिनकर भोसले, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’चा सिक्वेल येतोय

<<< प्रभा कुडके >>>

‘ए भोसले खायची नाय ऐपत, मग पापलेट का बसलास दाबत’, ‘मला मराठीतच बाबा म्हणायचं’ या अशा अनेक संवादांनी थिएटर दुमदुमले होते तो चित्रपट म्हणजे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय.’ चित्रपटातील दिनकर भोसले या पात्राने प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात निर्विवादपणे स्थान मिळवले होते.

या चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजेच ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय- 2’ सिक्वेल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2009 मध्ये हा चित्रपट पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने त्यावेळी तब्बल 25 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवून मराठी चित्रपटासाठी चांगले दिवस आणले होते. येत्या काही दिवसांतच या चित्रपटाच्या पुढील भागाचे शूटिंग सुरू होणार आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ भाग-2 चित्रपटाची पटकथा सध्याच्या घडीला लिहून पूर्ण झाली आहे. परंतु यातील मुख्य बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र कोण वठवणार यासाठी शोध सुरू झालेला आहे. याआधीच्या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी महाराजांचे पात्र वठवले होते. आगामी भागामध्ये महेश मांजरेकर शिवाजी महाराजांची भूमिका वठवणार नाही हे शिक्कामोर्तब झाले आहे.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता. संतोष मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटामध्ये दिनकर भोसले यांची भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती. तसेच सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट आदी कलाकारांनी यामध्ये महत्त्वाच्या भूमिका वठवल्या होत्या.

तो नेता कोण?

2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मराठी माणसामध्ये एक आगळीवेगळी उर्मी भरली. आता पुन्हा येणाऱ्या सिक्वेलमध्ये नेमके कोणते मुद्दे आणि आगामी गणितं असणार आहे यासाठी काही काळ वाट पाहावीच लागेल. या येणाऱ्या दुसऱ्या भागाची खासियत म्हणजे यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रसिद्ध चेहराही महत्त्वाची छोटेखानी भूमिका वठवणार आहे.

यासंदर्भातील माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या चित्रपटाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी महेश मांजरेकरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. आगामी महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळी आधी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ भाग 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की.

मराठी माणूस केंद्रस्थानी

मराठी माणसाला केंद्रस्थानी धरूनच मूळ चित्रपटाची कथा ही महेश मांजरेकर यांनी लिहिली होती. मराठी माणसामधील न्यूनगंडावर या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय समर्पक भाषेत मांडणी करण्यात आली होती. आगामी भागातही मराठी माणूस हाच कथेच्या केंद्रस्थानी असणार असून मराठी माणसांसंदर्भातील इतर अनेक मुद्दे दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहेत.