संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्यात आला असला तरी तपास यंत्रणांनी वाल्मीक कराडवर मकोका लावला नव्हता. यावरून प्रचंड टीका झाली. विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी देखील आंदोलन केलं. अखेर आज वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला. यानंतर कराड समर्थकांनी परळीत आंदोलन केलं. या आंदोलनात वाल्मीक कराडची आई पारूबाई कराड या देखील आंदोलनासाठी बसल्या होत्या. आंदोलनावेळी त्यांना भोवळ आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
याआधी वाल्मीक कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे वाल्मीक कराडला पाठीशी घालण्यात आल्याचे आरोप होत होते. त्यामुळे सरकारची प्रतीमा डागाळली. विशेष म्हणजे वाल्मीक कराडवर मकोका लागला पाहिजे अशी मागणी विरोधकांसह भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील केली होती. त्यामुळे भाजपला घरचा अहेर मिळाला. वाल्मीक कराडला आज केज न्यायालयात सादर करण्यात आल. त्यावेळी तपास यंत्रणांना तपासासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले आणि तपास कुठपर्यंत आला त्याची माहिती समोर ठेवण्यास सांगितली. त्यावेळी वाल्मीक कराडवर मकोका लावण्याचे तपास यंत्रणांनी सांगितले. अखेर वाल्मीक कराडवर मकोका लावण्यात आला. त्यासोबतच त्याची न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ सुनावण्यात आली.