वयोवृद्ध क्रिकेटपटूंची एमसीएक काळजी रे…, 87 क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये एमसीएने केली 50 टक्के वाढ

देशातील क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या क्रिकेट संघटनेने (एमसीए) ज्येष्ठ आणि वयोवृद्ध क्रिकेटपटूंबाबत आपली काळजी आणि कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या पेन्शनमध्ये 50 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या एमसीएच्या अॅपेक्स कौन्सिल बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली.

मुंबई क्रिकेट संघटनेनेच माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंसाठी पेन्शन सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. क्रिकेटपटूंना पेन्शन देणारी एमसीए ही एकमेव राज्य क्रिकेट संघटना आहे. गेली अनेक वर्षे एमसीए 70 वर्षांवरील क्रिकेटपटूंना दरमहा 20 हजार तर 70 वर्षांखालील क्रिकेटपटूंना दरमहा 10 हजार रुपये पेन्शन देत होती. आता ती पेन्शन 50 टक्के वाढवल्यानंतर 30 हजार आणि 15 हजार रुपये इतकी झाली आहे. सध्या एमसीए 70 वर्षांखालील 70 तर 70 वर्षांवरील 13 क्रिकेटपटूंना पेन्शन देत आहे. हीच पेन्शन योजना वयोवृद्ध पंचांसाठीही लागू आहे. त्यांनाही इतकेच पेन्शन दिले जात आहे. एमसीएने आपल्या निवृत्त आणि 58 वर्षांवरील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि पंचांसाठी ही योजना पवांराच्या अध्यक्षपदाच्या काळात सुरू केली आहे, जी आजही सक्षमपणे सुरू आहे.

पेन्शनसाठी 69 लाखांची वाढ

एमसीएने वयोवृद्ध आणि दिग्गज प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंसाठी असलेल्या पेन्शनमध्ये 50 टक्के अशी भरीव वाढ केल्यामुळे त्यांच्यावर वर्षाला 69 लाख रुपयांचा अतिरिक्त बोझा पडला आहे. एमसीएने हा वाढीचीही आपल्या बजेटमध्ये तरतूद केल्याची माहिती अध्यक्ष नाईक यांनी दिली.

सध्या क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा आला आहे, मात्र आधी क्रिकेटमध्ये इतका प्रचंड पैसा नव्हता. म्हणूनच एमसीएने आपल्या वयोवृद्ध खेळाडूंची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी पेन्शन योजना सुरू केली होती. आज त्या पेन्शनमध्ये 50 टक्के वाढ केल्यामुळे ज्येष्ठ क्रिकेटपटूंनी एमसीएचे मनापासून आभार मानले आहे.

क्लब क्रिकेटच्या प्रतिनिधींना 10 लाखांचे विमा कवच

एमसीएने क्रिकेटपटू आणि पंचांसह आपल्या संघटनेशी संलग्न असलेल्या 329 क्लबच्या प्रतिनिधींनाही 10 लाखांचे विमा कवच दिले आहे. हा लाभ प्रत्येक क्लबच्या अधिकृत प्रतिनिधीलाच लाभणार असल्याचे एमसीएने कळवले आहे.

ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या सन्मानासाठी प्रयत्न

‘आपल्या माजी क्रिकेटपटूंनी आणि पंचांनी मुंबईच्या गौरवशाली क्रिकेट परंपरेची भक्कम पायाभरणी केली आहे. त्यांचे योगदान लक्षात घेता त्यांची मासिक पेन्शन 50 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय हा त्यांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक मदतीसाठी एक प्रयत्न आहे.’ मुंबई क्रिकेटची खरी ताकद म्हणजे आपल्या संलग्न क्लब्स आणि त्यांचे प्रतिनिधी. त्यांनी निरपेक्षपणे क्रिकेटच्या सेवेसाठी मेहनत घेतली आहे. त्यांना 10 लाखांपर्यंत वैद्यकीय विमा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि कल्याणाची जबाबदारी आपण घेत आहोत. – अजिंक्य नाईक, अध्यक्ष (एमसीए)