खेलोगे कुदोगे और साथ में पढोगे तो बनोगे साहब, क्रिकेटचा अभ्यास करून होता येणार पदवीधर

‘पढोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कुदोगे बनोगे खराब’ ही म्हण काळानुसार कधीच बदलली गेलीय. आता खेळातही करीअर बनवता येते हे अवघ्या जगाने मान्य केलेय, पण आता मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) याबाबत आणखी एक पाऊल पुढे टाकत क्रिकेटचा अभ्यास करूनही पदवीधर होता येणार हे जाहीर केलेय. म्हणजेच ‘खेलोगे कुदोगे और साथमें पढोगे लिखोगे तो बनोगे साहब.’ खुद्द एमसीएनेच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने आगामी शैक्षणिक वर्षात क्रिकेटविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आपल्या हिंदुस्थानात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटपटू हा सर्वांच्या गळ्यातला ताईत असतो. त्याला देवाचा दर्जाही दिला जातो, पण आता याच क्रिकेटला पुस्तकाचाही दर्जा लवकर दिला जाणार आहे. क्रिकेटच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक तयार करून त्यात खेळपट्टी तयार करणे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, आकडेवारी, पंच यांसारख्या विविध गोष्टींचा अभ्यास करता येणार आहे. या अभ्यासक्रमात अधिकाधिक प्रात्यक्षिक व प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे. जेणेकरून खेळाडूंना आपल्या व्यावसायिक स्तरावर खेळण्यासाठी अधिकाधिक मदत मिळू शकेल. येत्या जून-जुलैपासून या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार असल्याची माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी दिली. एमसीएच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर क्रिकेटच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णयही एमसीएने घेतले आहेत.

युवा क्रिकेटपटूंसाठी इंग्लंडचा दौरा

आजवर मुंबईतील क्रिकेट क्लब आपल्या युवा खेळाडूंसाठी इंग्लंडचा छोटेखानी दौरा आयोजित करून पैसा कमवत होते. मात्र आता एमसीएनेही ही परंपरा मोडीत काढण्यासाठी आणि क्रिकेटपटूंची होणारी लूट थांबविण्यासाठी स्वतःच या दौऱयांचे आयोजन करून इंग्लंडशी आपले क्रिकेट संबंध अधिक दृढ करणार आहेत. या दौऱयात युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव आणि उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक क्रिकेटचा लाभ घेण्याची संधी लाभणार आहे.