एमबीबीएसचा पेपर फुटला, 19 डिसेंबरला फेरपरीक्षा; कुलगुरूंचे चौकशीचे आदेश

एमबीबीएसचा द्वितीय वर्षाचा फार्मा कोलॉजी-1 या विषयाची प्रश्नपत्रिका पेपर सुरू होण्याच्या 1 तास आधी फुटली अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठास मिळाली आहे. यामुळे या विषयाचा 2 डिसेंबरचा झालेला पेपर रद्द करण्यात आला आहे. आता 19 डिसेंबर रोजी पुन्हा हा पेपर घेण्यात येणार आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे तसेच पोलिसात तक्रार देण्याचे आदेश कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिले आहेत.

राज्यभरातील 50 परीक्षा केंद्रांवर 7 हजार 900 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्याची प्रश्नपत्रिका हा पेपर सुरू होण्याच्या 1 तास आधी फुटली होती, असा मेल मंगळवारी 3 डिसेंबर रोजी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नाशिक मुख्यालयास प्राप्त झाला. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 2 डिसेंबरचा झालेला हा पेपर रद्द केला आहे. 19 डिसेंबरला या विषयाची फेर परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली. या प्रकरणी सायबर सेलअंतर्गत तपास करण्यात येणार असून गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.