संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 6 जुलै रोजी सातारा जिह्यात येत असून, या सोहळ्याचा जिह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. वारकऱ्यांना जास्तीत जास्त उत्तम सोयी-सुविधा देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
माउलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा व पुणे जिह्याच्या सीमेवर नीरा नदी येथे 6 जुलै रोजी स्वागत होणार आहे. त्यानंतर 6 व 7 रोजी हा सोहळा लोणंद (ता. खंडाळा) येथे दोन दिवस विसावणार आहे. हा सोहळा लोणंद येथून 8 जुलै रोजी तरडगावच्या दिशेने निघणार असून, दुपारी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर हा सोहळा तरडगाव येथे विसावेल. फलटण विमानतळावर 9 जुलै रोजी मुक्काम असून दि. 10 रोजी बरड येथे सोहळ्याचा मुक्काम आहे. पालखी सोहळ्याचे सोलापूर जिह्यात दि. 11 जुलै रोजी प्रस्थान होणार असून, मुक्काम नातेपुते येथे आहे. माउलींच्या पालखी सोहळ्याचे सर्व विभागांनी समन्वय साधून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी विविध विभागांच्या बैठका घेऊन दिल्या आहेत.
माउलींचा पालखी सोहळा खंडाळा व फलटण तालुक्यातून जाणार आहे. या सोहळ्यात 290 नोंदणीकृत दिंड्या आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी लोणंद, तरडगाव, बरड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा तालुक्यात 8 व फलटण तालुक्यात 14 वैद्यकीय मदत पथके असतील. लोणंद, तरडगाव, बरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटणचे उपजिल्हा रुग्णालय येथे प्रत्येक ठिकाणी 5 खाटांचे आयसीयू असणार असून, यामध्ये फिजिशियन, स्त्री रोगतज्ञ, मॉनिटर व व्हेंटिलेटर असणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्याच्या जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज आहे. पालखीमार्गावरील आरोग्य सुविधांमध्ये औषधांचा आवश्यक साठा ठेवण्यात येत आहे. साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले.
आरोग्य सेवेसाठी 660 अधिकारी, कर्मचारी
माउलींच्या पालखी सोहळ्यात पाडेगाव ते बरड सातारा जिल्हा हद्दीपर्यंत प्रत्येक दोन किलोमीटरवर पुरेशा औषध साठ्यासह एक रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका अशी 33 पथके असणार आहेत. 108 रुग्णवाहिकांची 8 पथके असून फिरती वैद्यकीय पथके 20 असणार आहेत. एक पथक 14 दिंड्यांना आरोग्य सेवा देणार आहे. सोहळ्यादरम्यान हॉटेल ओटी संनियंत्रणासाठी 3 पथके असून पालखीमार्गावरील लहान मोठ्या हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याचे ओटी संनियंत्रण करून हॉटेल कामगारांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. पाखलीमार्गावर आरोग्य सेवा देण्यासाठी 660 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पाणी शुद्धीकरणासाठी 29 पथके तैनात
पाणी शुद्धीकरणासाठी खंडाळा तालुक्यात पाच, फलटण तालुक्यात 29 पथके असून, टँकर फिडिंग पॉइंट खंडाळा तालुक्यात 13, फलटण तालुक्यात 35 आहेत. पालखीमार्गावर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र व फलटणचे उपजिल्हा रुग्णालय या तीन ठिकाणी 24 तास नियंत्रण पथके कार्यरत असणार आहेत. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी आरोग्य सेवांची माहिती दर्शवणारे बॅनर्स लावण्यात येणार आहेत. पालखीमार्गावर पाणी पुरवठ्यांच्या 405 सुविधा असून, यामध्ये सार्वजनिक विहिरी 7, बोअरवेल 74, खासगी विहिरी 315, नळ योजना 9, टँकर संख्या 39, फिडिंग पॉइंट 48 यांचा समावेश आहे.