
माटुंगा येथे राहणाऱया 20 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्रेमप्रकरणातील नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. याप्रकरणी माटुंगा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
झाना सेठिया असे तिचे नाव होते. झाना दक्षिण मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱया वर्षाला शिकत होती. झाना कुटुंबीयांसह माटुंग्याच्या हिंदू कॉलनीतील टेक्नो हाईट्स या 14 मजली इमारतीत आठव्या मजल्यावर राहत होती. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या गच्चीवरून तिने खाली उडी टाकली. झानाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिचे लहानपणापासूनचे जवळचे मित्र नेहमीप्रमाणे तिच्या घरी गेले होते. त्यानंतर तिघेही इमारतीच्या गच्चीवर गेले. काही वेळ झाल्यानंतर झानाने अचानक गच्चीवरून स्वतःला खाली झोकून दिले. झाना गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होती. पोलिसांना कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नसून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.