क्षुल्लक वादातून नवऱ्याने चावला बायकोचा ओठ; सोळा टाके पडले, कागदावर लिहून सांगितली घटना

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून विचित्र घटना समोर आली आहे. घरगुती हिंसाचारातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा ओठ चावल्याने तिला 16 टाके पडले आहेत.याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. महिलेला टाके घातल्यामुळे बोलता येत नसल्याने तिने संपूर्ण घटना कागदावर लिहून सांगितली. तिने पती, दिर आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एजन्सीनुसार, मगोराचे एसएचओ मोहित तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागला भुचन येथील महिलेने आरोप केला आहे की, शुक्रवारी संध्याकाळी ती घरी काम करत असताना पती विष्णू घरी आला आणि विनाकारण वाद उकरुन काढला.तिने त्याला शांत होण्यास सांगितले असता त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि संतापलेल्या पतीने तिचे ओठ चावला, त्यानंतर ती रक्तबंबाळ झाली.नणंद मध्यस्थी करायला आली असता पतीने तिलाही मारहाण केली. पतीच्या या कृत्याबद्दल तिने सासू आणि दिराकडे तक्रार केली असता ते त्याला काहीच बोलले नाही. उलट तिलाच मारहाण केली, असेही महिलेने पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पीडितेचे वडिल तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि पती विष्णू, सासू आणि मेहुण्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलेच्या ओठांना 16 टाके पडले आहेत. स्टेशन हाऊस ऑफिसर मोहित तोमर यांनी सांगितले की, काही घरगुती कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. घटनेनंतर तिन्ही आरोपी घरातून बेपत्ता आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.