मिंधे आमदार महेंद्र थोरवेंच्या एककल्ली कारभाराविरोधात माथेरानकर आक्रमक

स्थानिकांना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांना हाताशी धरून कर्जतचे मिंधे आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानमधील ई-रिक्षांचा स्टॅण्ड परस्पर घोडेवाल्यांना आंदण दिला. थोरवे यांच्या या एककल्ली कारभाराविरोधात माथेरान बचाव समिती आक्रमक झाली असून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि पुरंदर हवेली विधानसभेचे संपर्कप्रमुख अनिल घोणे यांची भेट घेत चर्चा केली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही थोरवे यांच्या मनमानीविरोधात आवाज उठवत मंत्री, आमदारांकडे धाव घेऊन अन्यायाचा पाढा वाचला आहे.

पर्यटकांची घोडेस्वारांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी माथेरानच्या प्रवेशद्वाराजवळ ई-रिक्षा उभ्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर १०० मीटर अंतरावर घोडेचालकांना जागा देण्यात आली. मात्र घोडे व्यावसायिकांनी आमदार थोरवे यांची नेरळ येथील कार्यालयात भेट घेताच थोरवे यांनी माथेरान गाठले आणि हा निर्णय परस्पर फिरवत ई-रिक्षांना हटवून त्या ठिकाणी घोडेचालकांना जागा दिली आहे. तसेच पार्किंगमध्येही जाण्यास घोडेचालकांना परवानगी दिल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला असून थोरवे यांनी माथेरानमधील ढवळाढवळ थांबवावी असे खडे बोल सुनावले. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तर राजीनामे देत थोरवेंच्या मनमानीविरोधात आवाज उठवला. शिवसैनिकांनीही थोरवे यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्याचा निर्धार केला आहे.

९४ ई-रिक्षांसाठी पाठपुरावा करणार

शिवसेनेचे माथेरान शहरप्रमुख कुलदीप जाधव व माथेरान बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि पुरंदर हवेली विधानसभेचे संपर्कप्रमुख अनिल घोणे यांची भेट घेत माथेरानच्या ई-रिक्षासंदर्भात चर्चा केली. माथेरान शहरात सध्या २० ई-रिक्षा सुरू असून ७४ ई-रिक्षांना न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली अशी माहिती शहरप्रमुख कुलदीप जाधव यांनी दिली.

थोरवेंविरोधातील वाद.. फडणवीसांशी चर्चा करणार

माथेराव बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली. यावेळी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थोरवे यांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. माथेरानच्या पर्यटनवाढीसाठी ई-रिक्षासोबतच रोप वे, फर्निकुलर या पर्यायी मार्गासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली. या सर्व मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन प्रशांत ठाकूर यांनी दिले आहेत