माथेरानमधील ई-रिक्षांची संख्या वाढवा, संघर्ष समितीने घेतली सचिन अहिर यांची भेट

निसर्गरम्य माथेरानमध्ये सध्या 20 ई-रिक्षा धावत असून पर्यटकांच्या संख्येचा विचार करता ही संख्या अत्यंत अपुरी आहे. स्थानिकांची गरज लक्षात घेता लवकरात लवकर ई-रिक्षांची संख्या वाढवावी यासाठी माथेरान संघर्ष समिती प्रयत्नशील आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांची भेट घेतली.

गेल्या काही वर्षांपासून माथेरानमध्ये ई-रिक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा वाद न्यायालयातदेखील सुरू होता. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला ई-रिक्षा प्रकल्प यशस्वी झाल्याने त्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. हातरिक्षाचालकांची अमानवी कृत्यातून सुटका व्हावी यासाठी या ई-रिक्षा महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. मात्र न्यायालयाने ई-रिक्षांची संख्या वाढवणार नाही, अशी भूमिका घेतल्याने मोठी पंचायत झाली आहे.

ई-रिक्षांच्या प्रश्नावर शिवसेनेचे माथेरान शहरप्रमुख कुलदीप जाधव, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, माजी नगरसेवक प्रसाद सावंत, भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी रत्नदीप प्रधान, सचिन दाभेकर, युवासेनेचे श्रेयस गायकवाड, शकील पटेल, सुनील शिंदे, किरण चौधरी, आकाश चौधरी आदींनी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या प्रश्नात आपण स्वतः लक्ष घालून ई-रिक्षाचालकांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन अहिर यांनी दिले आहे.

भाजप आमदारांचे फुसके आश्वासन
हातरिक्षा चालवणाऱ्यांना ई-रिक्षा चालवण्यासाठी द्याव्यात, असा आदेशदेखील न्यायालयाने दिला होता. पण ई-रिक्षांची संख्या वाढवण्यास नकार दिल्याने पुन्हा त्यांच्या नशिबी हातरिक्षा ओढणेच येणार आहे. माथेरानमध्ये हातरिक्षाचालकांची संख्या 90 आहे. तर ई-रिक्षा फक्त 20 धावतात. अशा परिस्थितीत 70 हातरिक्षाचालकांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही तोडगा निघालेला नाही.