धोनी माझ्यासाठी पित्यासारखाच, मथिशा पथिरानाची भावना

ज्याप्रमाणे माझे वडील मला मार्गदर्शन करतात, त्याचप्रमाणे महेंद्रसिंह धोनीचेदेखील मला मोलाचे मार्गदर्शन लाभत असून त्याचा पाठिंबा मिळत आहे. तसेच धोनीने दिलेला सल्लादेखील माझ्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यामुळे धोनी मला माझ्या वडिलांसारखाच आहे, अशी भावना चेन्नईचा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरानाने व्यक्त केली आहे. चेन्नईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये पथिराना धोनीबद्दल भावना व्यक्त करताना दिसत आहे. पथिरानाचे पालकदेखील धोनीचे काwतुक करताना दिसत आहेत. 2022 मध्ये अॅडम मिल्नेच्या जागी पथिराना चेन्नईमध्ये सामील झाला, परंतु श्रीलंकेचा हा गोलंदाज लवकरच धोनीच्या जवळ गेला. धोनीने वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. जेव्हा मी चेन्नईमध्ये असतो तेव्हा तो मला खूप पाठिंबा, मार्गदर्शन आणि सल्ला देतो. माझे वडील घरी हेच करतात. म्हणूनच मी धोनीला क्रिकेटमध्ये माझ्या वडिलांप्रमाणे मानतो. धोनी पथिरानाला ‘माली’ या टोपणनावाने हाक मारतो. कारण त्याची गोलंदाजीची शैली श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगासारखी आहे. 22 वर्षीय पथिरानाने आयपीएलमधील त्याच्या विकासाचे श्रेय धोनीला दिले. त्याच्या पालकांनीदेखील सांगितले की, धोनीने त्यांना पथिरानाची काळजी घेण्याचे वचन दिले होते.