विधानसभा निवडणुकीत पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांमध्ये पक्षपातीपणा करणाऱया मिंधे सरकारला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) चांगलीच चपराक दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील 21 पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांना मॅटने स्थगिती दिली आहे.
मॅटच्या अध्यक्षा मृदुला भाटकर यांनी हे स्थगिती आदेश दिले. बदलीला स्थगिती दिलेल्या अधिकाऱयांना आहे त्या ठिकाणी रुजू करून घ्या, असे आदेश मॅटने दिले आहेत. पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांचे राज्य शासन, पोलीस महासंचालक व अन्य प्रतिवादींनी प्रत्युत्तर सादर करावे, असेही मॅटने सांगितले आहे. यावरील पुढील सुनावणी 27 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
मुलांची दहावी, बारावी आहे
बदली झाल्यास काही अधिकाऱयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यांच्या मुलांचे दहावी, बारावीचे वर्ष आहे. त्यांना घरगुती व शारीरिक समस्या आहेत. अशा परिस्थितीत या अधिकाऱयांची बदली करणे व्यवहार्य नाही, असेही मॅटने नमूद केले.
धोरणात चूक असल्यास तपासले जाईल
काही पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या का नाही झाल्याचे याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी निवडणूक आयोग व पोलीस आयुक्तांना द्यायला हवी. याच्या धोरणात काही चूक असल्यास ती तपासली जाईल, असे मॅटने स्पष्ट केले.
या अधिकाऱयांना दिलासा
अजय क्षीरसागर, जयश्री गजभिये, मनीषा शिर्पे, गणेश सावर्डेकर, राजेंद्र काणे, संतोष कोकरे, राजीव चव्हाण, प्रवीण राणे, जगदीश देशमुख, शशिकांत जगदाळे, ज्योती बागुल-भोपळे, सुशीलकुमार गायकवाड, फिरोजखान पठाण, अशोक पारधी, दुष्यंत चव्हाण, सतीश पवार, संजय धोनर, इक्बाल शिकलगर, बापूसाहेब बगल, अनंत साळुंखे व व्ही. व्ही. मदये यांच्या बदल्यांना मॅटने स्थगिती दिली.
पोलीस आयुक्तांचे सॅण्डविच
या प्रकरणात पोलीस आयुक्तांचे सॅण्डविच झाले. एकीकडे निवडणुकीच्या काळात मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयुक्तांवर आहे, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करणेही बंधनकारक आहे, पण निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे आयुक्तांचे कर्तव्यच आहे, असे निरीक्षण मॅटने नोंदवले.
काय आहे प्रकरण
विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांमध्ये मर्जीतल्या अधिकाऱयांवर मेहरनजर झाल्याचा आरोप करत काही पोलीस निरीक्षकांनी मॅटसमोर धाव घेतली. अॅड. अरविंद बांदिवडेकर, अॅड. प्रशांत नागरगोजे व अॅड. आशीष गायकवाड यांच्यामार्फत मॅटकडे अर्ज करण्यात आले.