ठाण्यातील हुक्का पार्लरचा ‘आका’ कोण? गृहराज्यमंत्र्यांच्या कोम्बिंग ऑपरेशनच्या आदेशाचा धूरच; बेकायदेशीर धंद्यांमुळे तरुणाई नशेच्या आहारी

ठाण्यात बोकाळलेल्या हुक्का पार्लर आणि डान्स बारवर कारवाई करावी यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला. यावर मिंध्यांचे आमदार व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून तत्काळ कारवाई करा, असे आदेश पोलिसांना दिले. मात्र अधिवेशन संपून आठ दिवस उलटले तरी ही कारवाई कागदावरच आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांनी आवाज उठवूनही बडगा उगारला जात नसल्याने ठाण्यातील हुक्का पार्लरचा ‘आका’ कोण, असा सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान या बेकायदा धंद्यांना आशीर्वाद मिळत असल्याने तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात तरुण पिढी हुक्का पार्लर संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच हर्बलच्या नावाखाली अनेक ठिकाणी हुक्का पार्लर सुरू आहेत. एवढेच नव्हे तर परमिट रूमच्या आडदेखील हा गोरखधंदा सुरू आहे. त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहे. समाज माध्यमांवर तर छुप्या आकर्षक जाहिराती प्रसारित केल्या जात असून त्या ठिकाणी गेल्यावर हुक्का पार्लर असल्याचेच आढळून येते. या हुक्का चालकांना व्यवसाय बंद करण्याची पोलिसांकडून फक्त समज दिली जाते पण या व्यवसायावर ठोस कारवाई करण्यात पोलीस कुचराई का करत आहेत, असा सवाल सर्वसामान्य ठाणेकरांनी उपस्थित केला आहे. याबाबत भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी यापूर्वी विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत कारवाईची मागणी केली होती.

‘दम मारो दम’ मागे अर्थकारणाचे राजकारण

आमदार केळकर यांनी प्रश्न उपस्थित करताच विधानसभेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते. मात्र ठाण्यात मिंध्यांच्या आशीर्वादानेच अनेक गोरखधंदे सुरू असून यामागे बगलबच्चांच्या अर्थकारणाचे राजकारण असल्यानेच गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांनी ‘केराची टोपली’ दाखवल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे. त्यामुळे कधी महापालिकेतील भ्रष्टाचार तर कधी बेकायदा धंद्यावरून बोंबाबोंब करूनही केळकरांचे कुणी ऐकत नसल्याने त्यांची अवस्था सहन होईना आणि सांगता येईना अशी झाली आहे.

  • कारवाईचा बडगा येथे उगारणार का?
  •  ऑरेंजमिंट, सिने वंडर मॉल,
  • हँगआऊट, मानपाडा,
  • डान्सिंग बॉटल, हैप्पी व्हॅली,
  • एमएच 04, कोठारी कंपाऊंड
  • आयकॉन, वंडर मॉल