
जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधार अबू कताल ऊर्फ कताल सिंघी हा शनिवारी रात्री पाकिस्तानमध्ये एका हल्ल्यात ठार झाला. तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य होता. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा अत्यंत जवळचा साथीदार अशी कतालची ओळख होती. पाकिस्तानातील झेलम येथे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.
गोळीबाराच्या घटनेवेळी कतालसोबत हाफिज सईददेखील होता, पण साथीदारावर हल्ला होताच हाफिजने घटनास्थळावरून पळ काढला. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. जम्मू-कश्मीरमधील शिव खोडी मंदिरातून परतणाऱ्या तीर्थयात्रेकरूंच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला अबू कतालनेच घडवून आणला होता. या हल्ल्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 2023 मध्ये राजौरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या दोषारोप पत्रातही कतालच्या नावाचा उल्लेख होता.
पाकिस्तानमधून लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ल्याचा कट रचत असते. दरम्यान, दहशतवादी कारवाया करणारा अबू कताल पाकिस्तानी लष्करात दहशतवाद्यांची भरती करण्याचे काम करत होता.