
गोरेगावातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट होणार आहे. मास्टर प्लॅननुसार दुग्ध वसाहतीचा आठ टप्प्यांत विकास करण्याचे प्रस्तावित आहे.
आरेच्या सर्वांगीण विकासासाठी नेमलेल्या सल्लागार पंपनीने मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले. त्यामध्ये दुर्मिळ प्राणी, वन्य जीव व वनस्पतींचा शोध घेणे, अत्याधुनिक गोशाळा उभारणे, बोटिंग, बगीचा, कलादालन आदी उभारण्यात येत आहे. हे करत असताना पर्यावरण संवर्धनास प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. मंत्री सावे यांनी आज आरे दुग्ध वसाहत परिसराची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला.
आरे दुग्ध वसाहतीकडे सध्या 1162 एकर जमीन शिल्लक असून यात दुग्ध वसाहत, गोशाळा, तबेले, बगीचा, लॉन, पॅराग्रास व वृक्षारोपण करण्यात आले आहे. आरे परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणी, परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या तसेच या भागात पर्यटनाला चालना देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.