महामंदीचं सावट! ट्रम्प यांच्या विधानानंतर जगभरातील शेअर बाजारात ‘ब्लड बाथ’, गुंतवणूकदारांवर रडायची पाळी

जगावर मंदीचे सावट अधिकच गडद होत चालले आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक मोठे विधान केले आणि अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजारात ‘ब्लड बाथ’ पहायला मिळाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंदीची शक्यता व्यक्त केली. यानंतर गुंतवणूकदारांनी विक्रीची सपाटा सुरू केल्याने अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स तब्बल 2.8 टक्क्यांनी कोसळला. दिवसभरात डाऊ जोन्सची 890 अंकांनी घसरण झाली. याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारावर पडले आहेत.

जपानचा शेअर बाजार निक्केई 820 अंक, हाँगकाँगचा शेअर बाजार 308 अंक, दक्षिण कोरियाचा शेअर बाजार 2.3 टक्के, तर ऑस्ट्रेलियाचा शेअर बाजार 1.8 टक्के कोसळला आहे. हिंदुस्थानच्या शेअर बाजारावरही याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांवर अक्षरश: रडायची पाळी येऊ शकते. सोमवारीही बाजारात विक्री दिसून आली असून सेन्सेक्समध्ये 217 अंक, तर निफ्टीमध्ये 92 अंकांची घसरण पहायला मिळाली होती.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

रविवारी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंदीचा धोका असल्याचे मान्य केले. आगामी काळात मंदी येईल का? असे विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ‘मला भविष्यवाणी वर्तवायला आवडत नाही. पण नक्कीच हा बदलाचा काळ असून त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. तसेच बाजाराला आवडा अथवा न आवडा तुम्हाला योग्य तेच करावे लागेल, असे म्हणत त्यांनी टॅरिफ नीतीचेही समर्थन केले.

शेअर धडाम

ट्रम्प यांच्या विधानाचा व्हायचा तोच परिणाम बाजारावर झाला. S&P इंडेक्स 2.7 टक्क्यांनी घसरला, तर डाऊ डोन्समध्येही 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यासह नॅस्डॅकही 4 टक्के कोसळला आणि सहा महिन्यातील सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला. याचा थेट परिणाम ट्रम्प यांचे सहकारी एलन मस्क यांच्या टेस्लाच्या शेअरवरही झाला आणि त्यात 15.4 टक्के घसरण पहयला मिळाली. तर एआय चीप उत्पादक कंपनी एनविडीया कॉर्पच्या शेअरमध्ये 5 टक्के घसरण झाली. मेटा, अमेझॉन, अल्फाबेटसह जगभरातील नामांकित कंपन्यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण दिसून आली.