मुंबईतील रस्त्यांच्या कामात महाघोटाळा, चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करा; आदित्य ठाकरे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या नियोजनशून्य रस्तेकामांमुळे सर्वत्र धुळीचे प्रदूषण होत आहे. शिवाय सर्वच रस्त्यांची कामे एकाच वेळी हातात घेऊन संपूर्ण मुंबई खोदून ठेवल्यामुळे वाहनचालकांसह मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापेक्षा भयंकर म्हणजे सरसकट काँक्रिटीकरण करण्याच्या नावाखाली पालिकेची तिजोरी रिकामी करण्याचा हा महाघोटाळाच सुरू आहे. त्यामुळे या महाघोटाळय़ाची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील सिमेंट-काँक्रीट रस्तेकामांतील घोटाळय़ांबाबत आपण अनेक वेळा तक्रारी केल्याची आठवणही आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. 2023-2024  या कालावधीत सिमेंट रस्ता काँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेवर अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, 21 मार्च रोजी सभागृहात सत्ताधारी पक्षाच्याच अनेक आमदारांनी याबाबत आवाज उठवला आहे. रस्त्यांच्या अपूर्ण कामांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या महाघोटाळय़ाची चौकशी करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिले आहे.

गुन्हे शाखेकडून चौकशी करा

2023-24 या कालावधीत सुरू झालेल्या मुंबईतील सर्व रस्ते कामांची आणि त्यातील टेंडर प्रक्रियेमधील घोटाळय़ांची चौकशी करण्यासाठी ईओडब्ल्यूकडून लवकरात लवकर चौकशी करून सदर प्रकरणात सहभागी असलेले कॉण्ट्रक्टर, अधिकारी व इतर दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आम्ही असा वाया जाऊ देणार नाही. मुंबईची होत असलेली वाताहत आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही.