दोन मजली घराला पहाटेच्या सुमारास भीषण आग, संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू

दोन मजली इमारतीला पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील देवास शहरात घडली. मयतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. दिनेश कारपेंटर, गायत्री, इशिका आणि चिराग अशी मयतांची नावे आहेत.

दिनेश यांची घराच्या तळमजल्यावर डेअरी होती. या डेअरी शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास आग लागली. ही आग वरच्या मजल्यावर पसरत गेली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत वरच्या मजल्यावरील खोलीत झोपलेल्या कारपेंटर कुटुंबाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यास अग्नीशमन दलाला यश आले. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.