दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी

फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण आग लागून पाच जण जखमी झाल्याची घटना दिल्लीत घडली. बुराडी भागातील एका कारखान्यात रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

उत्तर दिल्लीतील बुराडी परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावर हा कारखाना सुरू होता. पहिल्या मजल्यावर लोक राहत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. हिमांशू, आनंद, रवि प्रकाश आणि विजय पांडे अशी जखमींची नावे आहेत. तर देवेंद्र संधू असे अग्नीशमन दलाच्या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

हिमांशू गंभीर भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर अन्य तिघे 25 टक्के भाजले. अग्नीशमन दलाचे कर्मचारी देवेंद्र संधूही किरकोळ भाजले असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. याप्रकरणी तपास सुरू आहे.