आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील एका स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पेनेपल्ली येथील अग्रवाल स्टील प्लांटमध्ये बुधवारी रात्री मोठा स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्लांटमधून मोठ्या प्रमाणात आगीचे गोळे बाहेर पडत होते. त्यानंतर काही छोटे स्फोट झाले. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजून 15 मिनीटांनी झाली. प्राथमिक माहितीनुसार, जेव्हा प्लांटचा बॉयलर कथितरित्या खराब झाला, ज्यामुळे स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, घरांच्या खिडक्या तुटल्या आणि परिसरातील इमारतींचेही नुकसान झाले.
तिरुपतीचे पोलीस अधिक्षक एल सुब्बा रायडू यांनी सांगितले की, स्पंज लोह वितळवून लोखंडी गोळे बनवणाऱ्या एमएस अग्रवाल कंपनीत बुधवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला.सुब्बा रायडू यांनी पीटीआयला सांगितले की, या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, दुसरा गंभीर जखमी झाला आणि इतर चार जणांना किरकोळ जखमी झाले.औद्योगिक सुरक्षा समिती स्फोटाचे खरे कारण शोधून काढेल, असे ते म्हणाले. सर्व जखमींवर उपचार सुरू असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.