
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वडाळा स्थानकात बुधवारी सायंकाळी एका लोकलच्या चाकात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हार्बरची लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कुर्ल्यापासून काॅटन ग्रीन स्थानकापर्यंत लोकलच्या रांगा लागल्या. जवळपास तासभर लोकलची जागोजागी रखडपट्टी झाल्याने हार्बरच्या सर्व स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत लोकल गाड्या विलंबाने धावत होत्या. वडाळा स्थानकात बुधवारी सायंकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी-पनवेल लोकलच्या चाकात बिघाड झाला. ऐन गर्दीच्या वेळेस बिघाड झाला होता. हा तांत्रिक बिघाड मोटरमनच्या निदर्शनास येताच पुढील अनर्थ टाळण्यासाठी लोकल पूर्ण सावधगिरी बाळगत धिम्या गतीने कुर्ला स्थानकापर्यंत नेण्यात आली. तेथेच गाडीचा प्रवास रद्द करण्यात आला आणि ती लोकल पनवेलकडे न नेता कुर्ला यार्डमध्ये पाठवण्यात आली.