बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण राज्यात गाजत आहे. या प्रकरणात तपास संस्थाकडून होत असलेला विलंब, आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय पाठिंबा असल्याची चर्चा होत आहे. याबाबत राज्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. आता सीआयडी तपासाबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीवरुन उपरोधिक टोला लगावला आहे. या प्रकरणी गेले काही दिवस सुरू आहे ती धुळफेक आहे. पोलीस यंत्रणा आरोपींना शोधत नाही, सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे चौकशी द्यावी, अशी मागणी करत त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची सीआयडी मालिका ही प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत शिवाजी साटम हे सीआयडीचे प्रमुख आहेत. बीड प्रकरणाचा तपासावर सीआयडीकडून सुरु असलेल्या तपासावर त्यांनी हा टोला लगावला आहे.
माध्यमांना कळतं. मात्र पोलिसांना कळत नाही की तो शरण येणार आहे. त्याला अटक करायला 20-25 दिवस का लागले? वाल्मिक कराडसोबत 15 तारखेपर्यंत बॉडीगार्ड होते. हे बॉडीगार्ड आले कुठून, पेड किंवा, जिवीताला धोका असेल तर हे बॉडीगार्ड पेड होते की कमीटीने दिलेले? त्यांच्या जीवीताला धोका आहे म्हणून देण्यात आलेले बॉडीगार्ड होते? गुन्हेगारांना अटक व्हायला पाहिजे होती, 15 तारखेला बॉडीगार्डला माघारी बोलवण्यात येतं. मागच्या एसपींनी मागे घेण्याचे ऑर्डर दिले, फोनवरून या बॉडीगार्ड्सला बोलवण्यात आलं आणि फरार आहे म्हणून सांगण्यात आलं, असेही दमानिया म्हणाल्या.