फॉलोऑननंतर पाकिस्तानी फलंदाजी ट्रकवर

दक्षिण आफ्रिकेच्या 615 धावांच्या डोंगराला आव्हान देताना पाकिस्तानला पहिल्या डावात फॉलोऑनची नामुष्की सहन करावी लागली. पहिला डाव 194 धावांत गारद झाल्यामुळे पाकिस्तान 421 धावांच्या प्रचंड पिछाडीवर होता, पण दुसऱया डावात त्यांची फलंदाजी ट्रकवर आल्यामुळे त्यांनी तिसऱया दिवसअखेर 1बाद 213 अशी जबरदस्त सुरूवात केली होती. खेळ थांबला तेव्हा कर्णधार शान मसूद 102 तर खुर्रम शहझाद 8 धावांवर खेळत होते.

शनिवारी 3 बाद 64 अशा स्थितीत असलेल्या पाकिस्तानचा डाव बाबर आझम (58) आणि मोहम्मद रिझवानने (46) सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 98 धावांची भागी रचली. पण त्यानंतर त्यांचा डाव कुणीही सावरू शकला नाही आणि त्यांना फॉलोऑनची नामुष्की सहन करावी लागली. मात्र दुसऱया डावात शान मसूद आणि बाबर आझमने 205 धावांची शानदार सलामी देत पाकिस्तानच्या जिवात जीव आणला. बाबर दुसऱ्या डावात 81 धावांवर बाद झाला. आता पाकिस्तानला डावाचा पराभव टाळण्यासाठी अजून 208 धावा करायच्या आहेत.