अमेरिकेतून परतलेल्या गुजराती नागरिकांना चेहरे झाकून आणले! हेच का ते गुजरात मॉडेल, सोशल मीडियातून मोदी सरकारला सवाल

ट्रम्प यांच्या धोरणाची अंमलबजावणी करत अमेरिकेतून अवैध हिंदुस्थानी नागरिकांची पाठवणी सुरू झाली. या नागरिकांमध्ये गुजराती आणि हरयाणा, पंजाबमधील नागरिकांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे. पंजाबच्या अमृतसर विमानतळावरून गुजराती नागरिकांना अहमदाबाद येथील विमानतळावर आणण्यात आले. परंतु, विमानतळातून बाहेर पडताना सर्व नागरिकांचे चेहरे झाकलेले दिसत होते. ज्या गुजरात मॉडेलची देशभरात चर्चा होती ते हेच का? असा सवाल आता सोशल मीडियातून मोदी सरकारला केला जात आहे.

गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा तसेच इतर जिह्यांमध्ये राहाणाऱया नागरिकांना पोलिसांनी त्यांच्या घरी सोडले. या सर्व नागरिकांची ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांचे चेहरे झाकण्यात आले होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही होता.  जेणेकरून त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचू नये आणि गुजरात मॉडेलचा खरा चेहरा उघड होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याची टीका आता विरोधकांकडून होत आहे.

33 नागरिक अंडरग्राऊंड

बेकायदा स्थलांतरितांपैकी 33 गुजराती नागरिक अंडरग्राऊंड असल्याचे समोर आले आहे. 33 पैकी 26 जणांना घरी पोहोचवण्यात आले. बाकी 7 जण त्यांच्या पत्त्यावर मिळून आले नाहीत. एका कुटुंबाने सांगितले की त्यांना कुणाशीही बोलू नये अशी ताकीद सरकारनेच दिली आहे. या नागरिकांमध्ये सर्वाधिक नागरिक गांधीनगर आणि मेहसाणा जिह्यातील आहेत.