प्रो कबड्डीला बदलाचे वेध; कबड्डी महासंघाचा मशाल स्पोर्टससोबतचा करार संपुष्टात

आपल्या मातीतल्या कबड्डीची लोकप्रियता वाढवण्यात सिंहाचा वाटा असलेल्या प्रो कबड्डीला आता बदलाचे वेध लागलेत. प्रो कबड्डीच्या प्रारंभापासून स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या मशाल स्पोर्टसशी अखिल हिंदुस्थानी कबड्डी महासंघाचा (एकेएफआय) असलेला करार संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रो कबड्डीच्या नव्या मोसमात नवे रंग आणि नवे आयोजक पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज एकेएफआयने पब्लिक नोटीस काढताना मशाल स्पोर्टस्चा प्रो कबड्डीशी असलेला नऊ वर्षांचा घरोबा 30 जूनला संपल्याचे जाहीर केले. सध्या एकेएफआयवर प्रशासक असल्यामुळे हा निर्णय त्यांनीच घेतला आहे. कबड्डीत क्रांतीची मशाल पेटवताना प्रो कबड्डीत अल्पावधीतच जगभरात पोहोचली. कबड्डीपटू अर्थिकदृष्टय़ा श्रीमंत झाले, हिंदुस्थानात कबड्डीची व्रेझ वाढली. असे असताना मशालशी असलेला करार संपुष्टात आणणे हे कबड्डीच्या भल्याचे आहे की तोटय़ाचे याबाबत कबड्डीप्रेमींच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

काहींच्या मते आता प्रो कबड्डीला कुणाचीही गरज नसल्यामुळे एकेएफआयने नव्या आयोजकाला संधी देण्याच्या दृष्टीने पावले उचलली असावीत, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे मशाल स्पोर्टस्शी असलेला करार संपला म्हणजे नेमके काय घडले, याचा खुलासा झाल्यानंतर प्रो कबड्डीच्या भवितव्याबाबतही माहिती मिळू शकेल.