न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बुधवारी गुडबाय केला. याचबरोबर 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया मार्टिन गप्टिलची 14 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेर संपुष्टात आली, मात्र तो टी-20 लीग क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंड संघाचा भाग नव्हता. मार्टिन गप्टिल न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. यादरम्यान त्याने न्यूझीलंड संघासाठी अनेक मोठे विक्रम केले. मार्टिन गप्टिल हा न्यूझीलंडसाठी टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय एकदिवसीय विश्वचषकात द्विशतक झळकाविण्याचा पराक्रमही त्याच्या नावावर आहे. 2015 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये त्याने हे द्विशतक ठोकले होते. मार्टिन गप्टिलने 2009 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकाविले होते. 2009 मध्येच त्याने कसोटी आणि टी-20मध्ये पदार्पण केले. त्याच्या नावावर 47 कसोटी सामन्यांमध्ये 2586 धावा, 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7346 धावा आणि 122 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3531 धावा आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण 23 शतके आहेत.
न्यूझीलंडसाठी क्रिकेट खेळण्याचं बालपणी बघितलेलं स्वप्न सत्यात उतल्याचा मला अभिमान वाटतो. मी माझ्या देशासाठी 367 सामने खेळलो, हीदेखील माझ्यासाठी गौरवाची बाब होय. मी माझे सर्व सहकारी आणि प्रशिक्षक कर्मचाऱयांचे, विशेषतः मार्क ओडोनेल यांचे खूप आभार मानू इच्छितो. त्यांनी मला 19 वर्षांखालील स्तरापासून प्रशिक्षण दिले आणि माझ्या कारकीर्दीत सतत पाठीशी राहिले. चाहत्यांचेदेखील विशेष आभार!
– मार्टिन गप्टिल