
विक्रोळीत विवाहबाह्य संबंधातून अत्यंत क्रूर घटना घडली. पती रात्रपाळीला कामाला गेला असताना विवाहितेची तिच्या मित्राने गळा चिरून हत्या केली. गुन्हा करून आरोपी सटकला, पण विक्रोळी पोलिसांनी त्याला सहा तासांच्या आत धारावीतून उचलले.
विक्रोळी पुर्वेकडील मच्छी मार्केट परिसरात सूरजलाल माताफेर (45) हा त्याची पत्नी सुमन (35) हिच्यासोबत राहत होता. सुरक्षा रक्षकाचे काम करणारा सूरज सोमवारी रात्री कामाला गेला होता. त्यामुळे सुमन या रात्री एकटय़ाच घरी होत्या. मंगळवारी सकाळी सूरजलाल कामावरून घरी परतले असता सुमन रक्ताच्या थारोळय़ात पडलेली आढळून आली. सुमनचा गळा चिरलेला होता आणि हातदेखील बांधलेले होते. हे बघून सूरजच्या पायाखालची जमिनीच सरकली. याबाबत माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासात सुमनचे धारावीत राहणाऱ्या हनान शहा (25) यांच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे कळताच उपायुक्त विजय सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. खबरे व तांत्रिक माहितीच्या आधारे माग काढला असता आरोपी हनान हा धारावीत असल्याचे कळताच त्याला मुंबईबाहेर पळण्याआधीच पकडले.
तिने लग्नाचा तगादा लावला होता
सूरज आणि सुमन या दोघांचा दुसरा विवाह होता. दोघांचा संसार चांगला चालला होता. दरम्यान सुमन आणि हनान एके ठिकाणी कामाला असताना तेथे दोघांची ओळख झाली. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. सुमन मला लग्न कर म्हणत होती. तिने तसा तगादा लावला होता. त्यातूनच तिची हत्या केली असे हनानचे म्हणणे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. विक्रोळी पोलीस अधिक तपास करीत आहेत.