
नवीन वर्षात लग्नाचे मुहूर्त अधिक आले आहेत. अनेक जोडप्यांनी यातील आपल्या सोयीचा मुहूर्त निवडून लग्नाचा बार उडवण्याचे ठरवले आहे. लग्न समारंभांसाठी गेल्या वर्षीपेक्षा अधिक मागणी होऊ लागल्याने यंदा हॉलवाल्यांचे भाव वधारले आहेत. हॉलच्या भाड्यात पाच ते दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच सेल्फी पॉइंट, वधू मंडपासह जेवणाचा खर्च, वऱ्हाडींचा ने-आण करण्याचा वाहतूक खर्च आदी सर्व खर्चांत वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नाचे बजेट जुळवताना वधू-वर पक्षाची दमछाक झाली आहे.
‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणत बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झालेल्या वधू-वरांना नवीन वर्षात तब्बल लग्नाचे 85 ते 90 मुहूर्त आहेत. एरव्ही सर्वांच्या सोयीचा मुहूर्त निवडणे म्हणजे वधू-वरांसाठी मोठी कसोटी असते. यंदा मुहूर्ताचे टेन्शन दूर झाले आहे. मात्र हेच वाढीव मुहूर्त चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी ‘सुवर्णयोग’ असल्याचे मानून अनेक हॉलवाल्यांनी वेगवेगळय़ा मार्गांनी आपल्या दरांत वाढ केली आहे. मुंबईच्या शहर परिसरांसह उपनगरांतही हॉलच्या भाडेदरात जवळपास दहा टक्क्यांची वाढ झाली आहे. मुहूर्त बघून लग्नाची तारीख निश्चित करणारे वधू-वर पक्ष हॉलच्या भाड्याचे दर ऐकून चक्रावून जात आहेत. दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेल्या लग्न हॉलचे भाडे 500 लोकांसाठी पाच-साडेपाच लाखांच्या पुढे गेले आहे. याचवेळी मुंबईच्या सीमेवर असलेल्या दहिसरमध्येही तितक्याच वाढीव खर्चाची पह्डणी बसत आहे. त्यामुळे आपल्या बजेटमध्ये व सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी लग्नाचा हॉल कुठे शोधायचा, असा यक्षप्रश्न वधू-वर पक्षाला सतावत आहे.
यंदा लग्नाचे मुहूर्त अधिक असल्याने लग्न समारंभांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहे. मार्च, एप्रिलपेक्षा मे महिन्यात बुकिंगसाठी जास्त विचारणा होत आहे. त्यामुळे मे महिन्यातील हॉलचे भाडे तुलनेत अधिक आहे, असे स्पष्टीकरण दादर येथील एका लग्न हॉलच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आले.
उकाड्यामुळे एसी हॉलला वाढती मागणी
मुंबईतील वाढत्या उकाड्याचा विचार करून लग्नसमारंभांसाठी एसी हॉलची मागणी वाढली आहे. काही हॉलवाले लग्नसमारंभाचे पॅकेज देऊन त्यातून डेकोरेशन, साऊंड सिस्टम, वीज, साफसफाई आदीचा खर्च वसूल करताहेत. तसेच सेल्फी पॉइंट आणि वधूच्या प्रवेशावेळी तिच्या डोक्यावर फुलांची चादर धरण्याचा ट्रेंड आल्याने हॉलवाल्यांनी तेथेही भाव वाढवले आहेत. विधी मंडपसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.
जेवणाच्या एका डिशचा खर्च 700 ते 800 रुपये
लग्न समारंभाचे खास आयोजन करताना वधू-वरांकडून वेडिंग पॅटरर्सला पहिली पसंती दिली जात आहे. सर्वच हॉलमध्ये जेवणाच्या विविध प्रकारच्या डिश उपलब्ध केल्या जात आहेत. त्यातील रेग्युलर डिशचा खर्च 675 ते 700 रुपये असून सिल्व्हर डिशसाठी 800 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे 500 वऱ्हाडींसाठी जेवणाचा खर्च चार लाखांच्या घरात जात आहे.