केंद्र सरकारची 29 डिसेंबर 2016ची अधिसूचना रिक्षा, टॅक्सी व व्हॅनचालक-मालकांचे शोषण करणारीच आहे. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन 50 रुपयांचे विलंब शुल्क आकारणे हा काळा कायदा आहे. तो त्वरित रद्द केला नाही, तर राज्यातील लाखो रिक्षा मुंबईत मंत्रालयावर धडकतील, असा इशारा काँग्रेसचे शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज दिला.
परिवहन कृती समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याचे नेतृत्व पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्षा जयश्री पाटील, रामभाऊ पाटील यांनी केले. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून हलगीच्या कडकडाटात मोर्चा निघाला. ‘विलंब शुल्कचा काळा कायदा रद्द करा’, ‘केंद्र व राज्य सरकार मुर्दाबाद’, ‘शासन आपल्या दारी.. वसुली सामान्यांच्या घरी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. स्वराज्य रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी विलंब शुल्क कायद्याची माहिती देत गरीब रिक्षाचालक या दंडाने पिचून जातील, अशी भीती व्यक्त केली.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘15 दिवसांपूर्वी खणभागात झालेल्या बैठकीत काळे झेंडे लावून व्यवसाय करण्याचा निर्णय झाला. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. एकेकाळी रिक्षाचालक राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचे भान ठेवायला हवे होते. त्यांना रिक्षाचालकांच्या दुःखाचे काहीच वाटत नाही, हे आश्चर्यजनक आहे. रिक्षांना मुक्त परवानावाटप धोरणामुळे व्यवसाय संकटात आहे. आता शासनाने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी शुल्क आकारून जखमेवर मीठ चोळले आहे. एकाला दीड लाखाची नोटीस बजावली आहे, हे संतापजनक आहे.’
‘विलंब शुल्क भरणे शक्यच नाही. तो रद्द व्हावा, अशी सर्वांची मागणी आहे. सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी व वाहनचालक परवाना कृती समितीने एकीची वज्रमूठ बांधली आहे. शासनाने या पावसाळी अधिवेशनात विलंब शुल्क कायदा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालक-मालक संघटनेचा विधिमंडळावर भव्य मोर्चा काढण्यात येईल,’ असा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला.
शंभूराज काटकर म्हणाले, ‘रिक्षा व्यवसायिकांचे प्रश्न माहीत असलेले मुख्यमंत्री प्रश्न सोडवत नाहीत. हे वसुली सरकार आहे. सरकारला जनरेटय़ाची ताकद दाखवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आंदोलनाला पाठिंबा आहे.’ यावेळी सतीश साखळकर व विष्णू माने यांनी रस्त्यावरील व न्यायालयीन लढय़ासाठी संघटनेला पाठिंबा दिला.
यावेळी साजीद अत्तार, अभिजित माने, वसंत इंगळे, महेश बासुटे, हणमंत मंडले, नितीन वाघमारे, किरण कुरकुटे, खंडू कांबळे, शंकर वालकर, सागर येसुगडे, रामचंद्र सोनुले, मल्लिकार्जुन मजगे, अजित पाटील, श्रीधर बारटक्के, बबलू घोरपडे, सलीम कुरणे, रमेश सावंत, संजय शिंदे, दीपक दळवी, मुन्ना मालेदार, प्रमोद होवाळे, अमित घाडगे आदी उपस्थित होते.