पुणेकरांसाठी धावणार मराठवाड्यातील ‘लाल परी’

कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या कामगार, नोकरदारांची दिवाळीत गावी जाण्याची संख्या जास्त असते. त्यामुळे या काळात एसटीला मोठी गर्दी असते. त्या तुलनेत पुणे विभागात बसेसची संख्या कमी आहे. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बीड, लातूर, अकोला आणि नाशिक विभागांतून 250 जादा गाड्या मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे एसटी विभागाकडून देण्यात आली.

पुण्यात कामानिमित्त स्थायिक झालेल्या परजिल्ह्यांतील नागरिकांची संख्या जास्त आहे. दिवाळीत गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी प्रत्येकजण आसुसलेला असतो. त्यामुळे या काळात एसटीला मोठी गर्दी असते. परंतु पुणे एसटी विभागात प्रवासीसंख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवासी वाहतुकीचे नियोजन बिघडू नये, यासाठी बाहेरील विभागांतून 250 गाड्या मागविण्यात येणार आहेत. सध्या पुणे विभागात उपलब्ध असलेल्या 815 बसेसपैकी 521 बसेस या 10 वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे या बसेस जीर्ण आणि खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावर चांगल्या गाड्या सोडाव्या लागतात. यासाठी बाहेरील विभागांतील तंदुरुस्त गाड्या मागविण्यात येणार आहेत. पुण्यातून राज्यातील सर्व भागांत प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडू नये, यासाठी पुणे विभागाला दुसऱ्या विभागातील बसेसचा आधार घ्यावा लागतो.

नवीन गाड्यांची प्रतीक्षाच

एसटी महामंडळाकडून वापरण्यात येणाऱ्या बसेस या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यात बस पडणे, जोरात न पळणे अशा गोष्टी होत आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ‘ई- शिवाई’, ‘शिवनेरी’ व ‘लाल परी’ दाखल होण्यासाठी वेळ लागत आहे. तर, दुसरीकडे विविध सवलतींमुळे एसटीची प्रवासीसंख्या दीडपटीने वाढली आहे. त्यामुळे महामंडळाकडून दिवाळच्या काळात जादा गाड्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. परंतु इतर विभागांतील गाड्यांची पळवापळवीच सुरू आहे. केवळ तात्पुरत्या गाड्यांचे नियोजन न करता, कायमस्वरूपी एसटी बस वाढविण्याची गरज आहे.

दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बीड, लातूर, नाशिक व अकोला या विभागांतून 250 गाड्या मागविण्यात येणार आहेत. तसेच पुण्यातील 200 अशा 450 बसेस विविध मार्गावर सोडण्यात येणार आहेत.