मराठवाड्यात निष्ठावंतांचे तुफान! शिवसेना उमेदवारांचे वाजतगाजत अर्ज दाखल

मराठवाड्यात सोमवारी निष्ठावंताचे तुफानच आले! विधानसभेच्या रणांगणात धगधगती मशाल घेऊन उतरलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी वाजतगाजत, गुलाल उधळत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. धाराशिवमध्ये कैलास पाटील, गंगाखेडमध्ये विशाल कदम, तर गेवराईत बदामराव पंडित आणि परतूरमध्ये आसाराम बोराडे, छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये राजू शिंदे, सिल्लोडमध्ये सुरेश बनकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्रपक्षांचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. सोमवारी धाराशिव मतदारसंघातून वैâलास पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या प्रचंड रॅलीने धाराशिव दुमदुमून गेले. गंगाखेड मतदार संघातून विशाल कदम यांनी काढलेल्या रॅलीने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीमुळे गंगाखेड शहरात भगवे तुफानच आले होते. गेवराईत बदामराव पंडित यांनी वाजतगाजत आपली उमेदवारी दाखल केली. परतूर मतदारसंघात आसाराम बोराडे यांनीही प्रचंड रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी क्रांतीचौकातून प्रचंड रॅली काढत आपली उमेदवारी दाखल केली. सिल्लोडमध्ये सुरेश बनकर यांनीही आपली उमेदवारी दाखल केली.

परभणी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. राहुल पाटील, हिंगोलीतून रूपाली पाटील गोरेगावकर आणि कळमनुरीतून डॉ. संतोष टारफे हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.