
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत कथानकापासून ते तंत्रज्ञानापर्यंत अनेक नवनवीन प्रयोग पाहायला मिळतायत. सध्या सर्वच क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. ‘नरकासुर वध’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘एआय’चा वापर केला जाणार आहे. ‘पिकासो’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे.
कोकणासह गोव्यात दिवाळीच्या आदल्या दिवशी नरकासुर बनवण्याची प्रथा आहे. गवत, कागद आणि रंगीबेरंगी कापडापासून भव्य नरकासुर तयार करून त्याची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या पहाटे नरकासुर जाळला जातो. वाईट प्रवृत्ती जाळल्याशिवाय आनंदाची दिवाळी साजरी करता येत नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे लेखक-दिग्दर्शक अभिजित वारंग यांनी सांगितले. ‘नरकासुर वध’ या चित्रपटातील व्यक्तिरेखा एआयच्या माध्यमातून साकारल्या आहेत. सिने पिकासो निर्मित या चित्रपटाचे चित्रीकरण जूनमध्ये पूर्ण होणार असून दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.