
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केले. यावेळी केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
‘असे घडलो आम्ही’ या विषयावर ते म्हणाले, मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही. दिल्लीतील राजकारणी इरसाल असतात. त्यांच्याबरोबर व्यवहार करताना मराठी माणसाचे वेगळेपण महत्त्वाचे ठरते. परंतु मराठी माणसाकडे महत्वाकांक्षेची कमतरता असल्यामुळे तसेच तो अल्पसंतुष्टही असल्यामुळे केंद्रीय राजकारणात मराठी आवाज घुमला नाही, असे मत त्यांनी मांडले.
उत्तरेकडे सगळे राजकीय नेते दिल्लीत राहतात आणि केंद्रीय राजकारणच करतात. भाषेचा न्यूनगंड, दिल्लीतील हवामान, खाणे-पिणे या विषयांचा बाऊ करून मराठी माणूस दिल्लीतील राजकारणात मागेच पडला आहे. जनतेने मराठी नेत्यांना साथ देऊन केंद्रीय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. येथे संगीत खुर्चीचा खेळ होऊ देता कामा नये. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी मी केंद्रात मंत्री असताना याची प्रक्रिया सुरू झाली होती. पुढे महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना भाषेविषयी समिती स्थापन करून त्याचा अहवाल माझ्यामार्फतच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला पाठविला गेला. पुढे साहित्य अकादमीकडून हा अहवाल तपासला गेला. या संपूर्ण प्रक्रियेला मोठा कालखंड लागला, असेही त्यांनी सांगितले.