
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी ‘‘घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असे नाही,’’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांतून तीव्र निषेध होतोय. ‘अभिजात’ दर्जा मिळाला, पण मराठीला अपमानित करण्याचा प्रयत्न होतोय. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करू पाहणाऱ्या लोकांविरोधात आवाज उठविण्याची आणि मराठीला अपमानित होण्यापासून वाचविण्यासाठी मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचा सूर साहित्यिकांमधून उमटत आहे.
मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न
एकूणच मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. मी तर असे म्हणेन की, आपल्या लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मराठी भाषेनंतर पुन्हा हिंदीत बोलणे बंद केले पाहिजे. मागील 10 वर्षांत हे सुरू झालेय. कशाला हिंदीत बोलायचे. आपणच मराठीला दुर्बल का करायचे. लोकप्रतिनिधींनी मराठीत बोलले पाहिजे, तर सगळे बोलतील. एका प्रांताला ‘महाराष्ट्र’ म्हणणे दिल्लीला आवडत नाही. मुंबईची आर्थिक प्रगती बघवत नाही. ही खुन्नस आहे, ती अशी दिसून येते, अशी प्रतिक्रिया कवी रामदास फुटाणे यांनी दिली.
मुंबईला तोडण्याचे मनसुबे
मुंबई ही गुजरातला जोडण्याचा मनसुबा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आहे. 105 हुतात्मे आम्ही दिले आणि मुंबई महाराष्ट्रात ठेवली याची खुन्नस आहे. मुंबईतून उद्योग बाहेरच्या राज्यांत नेले जात आहेत, पण मुंबई ही मुंबई आहे. ती ताब्यात आली नाही तर ती केंद्रशासित करण्याचा डाव आहे. आम्हीही समस्त शाहीर म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख यांचे वारस आहोत, मानसपुत्र आहोत. या थोर मंडळींनी धाडसाने लढून मुंबई महाराष्ट्रात ठेवली. त्यामुळे मुंबईला तोडणाऱ्यांचे मनसुबे आम्ही खालसा केल्याशिवाय राहणार नाही, असे शाहीर संभाजी भगत म्हणाले.
हुतात्म्यांना काय उत्तर देणार?
सर्वप्रथम मी भैयाजी जोशी यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करते. महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिकांनी पक्ष, राजकारण विसरून या मुद्द्यावर एकत्र येऊन मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करू पाहणाऱ्या लोकांविरोधात आवाज उठवायला हवा.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंद साजरा करताना ती टिकणार कशी आणि अपमानित होण्यापासून ती वाचणार कशी, याचा विचार मराठी भाषिकांनी एकत्र येऊन करायला हवा.
स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व राज्यांची भाषावार प्रांतरचना झाली आहे. गुजरातची भाषा गुजराती, केरळची मल्याळी, कर्नाटकाची कन्नड, बंगालची बंगाली तशीच महाराष्ट्राची मराठी आहे हे वास्तव आहे. प्रत्येक राज्यात अन्य भाषिक भरपूर आहेत, पण ते त्या-त्या राज्याच्या भाषांचा सन्मान करतात. महाराष्ट्रातील मुंबईत मात्र हा सन्मान दिला जात नाही. केवळ मराठी सोडून इतर भाषिकांची एखाद्या ठिकाणी जास्त वस्ती असेल तर त्या उपनगराची किंवा गावाची भाषा ती कशी होईल हा साधा प्रश्न आहे. आज जर घाटकोपरची भाषा गुजराती होणार असेल तर उल्हासनगरची सिंधी किंवा माटुंग्याची कन्नड भाषा असे आपण म्हणणार का? मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून दिलेल्या लढ्यातील हुतात्म्यांना काय उत्तर देणार आपण?, असा सवाल कवयित्री नीरजा यांनी केला.
परप्रांतीयांचा मुजोरपणा
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा एखादा गुजराती आमदार किंवा मुंबईचा महापौर एखादा गुजराती नगरसेवक होईल, तेव्हा आपापसात भांडणाऱ्या मराठी लोकांना जाग येईल. मराठी लोकांची परस्पर फाटाफूट परप्रांतीयांच्या मुजोरपणाला खतपाणी घालतेय, असे कवी-लेखक महेश केळुसकर म्हणाले.