तुमच्या मराठीला गोळी मारा; वसईच्या सोसायटीतील उद्दाम सेक्रेटरीची मुजोरी, मराठी महिलेला जातिवाचक शिवीगाळ आणि फ्लॅट विकून जाण्यासाठी धमकी

घरातील पाणीपुरवठा बंद केल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी महिलेला वसईच्या नायगाव पूर्व येथील रोशन पार्क सोसायटीमधील उद्दाम सेक्रेटरीने जातिवाचक शिवीगाळ करत ‘तुमच्या मराठीला गोळी मारा’ अशी मुजोरी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तुम्ही मराठी लोकांनी इथून फ्लॅट विकून चालते व्हा, नाहीतर आम्ही तुमचा शारीरिक आणि मानसिक छळ करू, अशी धमकीही या सेक्रेटरीने दिल्याची तक्रार वसई पोलीस ठाण्यात स्विटी मांडवकर या मराठी महिलेने दिली आहे.

स्विटी नथुराम मांडवकर यांचे कुटुंब नायगाव पूर्व येथील रोशन पार्कमध्ये राहते. मध्यंतरी स्विटी मांडवकर यांचे बाळंतपण झाले. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या घरी चोरी झाली आणि चोरटय़ाने दागदागीने व पैसे चोरून नेले. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यातच त्यांचे बाळंतपण झाले. त्यामुळे त्यांना सोसायटीचा मेंटेनन्स भरता आला नाही. त्यानंतर सोसायटीच्या कमिटीने त्यांचा पाणीपुरवठा बंद केला. याबाबतची विचारणा करण्यासाठी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेल्या आणि मला दिलेली नोटीस मराठीतून द्या, अशी मागणी त्यांनी केली.

याआधी पाणी बंद केल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप

याआधीही सेक्रेटरी आणि कमिटीच्या सदस्यांनी एका वृद्ध व्यक्तीच्या घराचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. सोसायटीत 91 फ्लॅट्स आहेत. मात्र अनेक जणांची थकबाकी राहिली आहे. तरीही केवळ माझ्या कुटुंबालाच टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोपही मांडवकर यांनी केला.

तक्रारीत काय म्हटले?

मांडवकर यांनी आपल्या फ्लॅटचे पाणी का तोडले, इतकेच विचारल्यानंतर सेक्रेटरीचा तिळपापड झाला आणि त्याने ‘तुमच्या मराठीला गोळी मारा’ असे मुजोर उद्गार काढले. इतक्यावरच न थांबता तुम्ही मराठी लोकांनी इथून फ्लॅट विकून जा, नाहीतर आम्ही तुमचा मानसिक आणि शारीरिक छळ करू, अशी धमकीही दिली. मांडवकर यांनी त्यानंतर वसई पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदवली.