घाटकोपरमध्ये मांसाहारावरून मराठी-गुजराती वाद!

घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये मांसाहारावरून मराठी-गुजराती असा वाद झाल्याची घटना घडली. यामध्ये गुजरातील कुटुंबीयांनी मराठी कुटुंबीयांना मांसाहारावरून बोलण्यास सुरुवात केली. याचे पर्यावसान वादावादीत झाले. अखेर पोलिसांनी या घटनेत गुन्हा दाखल केला. घाटकोपरमधील या सोसायटीमध्ये सर्वाधिक गुजराती आणि इतर समाजाचे लोक राहतात. या ठिकाणी फक्त दोन ते चार मराठी कुटुंबे आहेत. या मराठी कुटुंबांमध्ये मांसाहार केला जात असल्यावरून गुजरातील कुटुंबीयांकडून मराठी कुटुंबीयांना हिणवले गेले. हा प्रकार वारंवार घडत आहे. दोन दिवसांपूर्वी गुजराती आणि मराठी असा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की या ठिकाणी पोलिसांना बोलवावे लागले. या प्रकरणावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवल्याचे समजते.