ठाण्यातील मराठी कुटुंबाला 19 वर्षांनंतर मिळाला फ्लॅटचा ताबा, शिवसेनेने दिला केतन मोरे यांना न्याय

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे ठाण्यातील केतन मोरे या मराठमोळ्या कुटुंबाला तब्बल 19 वर्षांनंतर फ्लॅटचा ताबा मिळाला आहे. प्रत्यक्ष हातात फ्लॅटच्या चाव्या मिळाल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. यापुढेही शिवसेना अन्यायग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

ठाण्याच्या नौपाडा परिसरातील बी केबीन येथे मोरे कुटुंब 50 हून अधिक वर्षे राहते. 2005 साली एका विकासकासोबत करारनामा करण्यात आला होता. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरही प्रत्यक्षात फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. अखेर हताश झाल्यानंतर केतन मोरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व यांच्याकडे धाव घेतली. यावेळी विचारे यांनी आपण घाबरू नका, तुम्हाला नक्की न्याय मिळेल, असा दिलासा दिला. माजी खासदार राजन विचारे यांनी या प्रकरणात माजी महापौर प्रेमसिंह रजपूत यांचे चिरंजीव आणि उपविभागप्रमुख प्रीतम रजपूत, शाखाप्रमुख रमेश शिर्के आदींना या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यास सांगितले. त्यांनी तातडीने संबंधित विकासक व मोरे कुटुंबामध्ये तीन बैठका घेतल्या. विकासकाला योग्य ती समज दिल्यानंतर फ्लॅटचा ताबा 19 वर्षांनंतर देण्यात आला. एका मराठी कुटुंबाला न्याय दिल्याबद्दल केतन मोरे यांच्या कुटुंबाने शिवसेनेचे आभार मानले आहेत.