परीक्षण : कृषिसंस्कृतीतला हुंकार

>>सत्यजित पाटील

वर्तमान व्यवस्थेचे दडपण झुगारून काही कवी आपली सम्यक वेदना मांडू शकतात. कवी ऐश्वर्य पाटेकर या जातकुळीतील कवी आहेत. त्यांचा ‘कासरा’ हा कवितासंग्रह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘कासरा’तील कविता कल्पनेचे विभ्रम नाहीत. वर्तमान वास्तवाचा घेतलेला समाचार आहे. थोडक्यात सांगायचे तर कृषिग्राम संस्कृतीच्या गळाघोटीतून उमटलेला हुंकार म्हणजे ‘कासरा’ असे म्हणता येईल. ऐश्वर्य पाटेकर साहित्य प्रवाहाला नवे नाहीत. ‘भुईशास्त्र’ काव्यसंग्रहाने त्यांचे नाव स्थिर केले आहे. ‘जू’ हे त्यांचे आत्मकथनही प्रचंड गाजले आहे.

‘कासरा’ संग्रहातील कविता वेगवेगळे शीर्षक धारण करून आलेली असली तरी ती खऱया अर्थाने ‘पूर्ण’ कविताच आहे; असे म्हणता येईल. कृषिजन संस्कृतीतील सर्वसामान्य जिवाचं ती रुदन आहे. नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या एखाद्या आदिम सभ्यतेची प्रतिनिधी असल्यासारखी ती अग्रभागी एकांडय़ा शिलेदारासारखी जमिनीत घट्ट पाय रुतवून आहे.

या संग्रहात काय नाही? इथे आईची चुलीचा विस्तव कुरवाळणारी बोटं आहेत, गोठय़ात गाईच्या हंबरण्यासोबतच येणारे शेणामुताचे काळीजव्यापी गंधसंवेदन आहे, पिरसायबाबाच्या यात्रेतील बालमनावर उमटलेले आणि इतका काळ तसेच ठळक असलेले हवेहवेसे कोवळे ओरखडे आहेत, उन्हा-पावसात होरपळणाऱया, सुलाखून निघणाऱया शिसवाच्या हाताच्या आयाबाया आहेत, भाषेच्या लसलसत्या हिरव्या झाडावर कवितेचे कोंब फुलावेत म्हणून आदिम चेतनेला घातलेले साकडे आहे, आवडाई, मथुबाई, विसा परसराम, सारखी व्यक्तिस्मृती आहेत, गाव माती, झाडे, पक्षी, पृथ्वी यांच्या सलामतीसाठीची भाकलेली पर्यावरणवादी करुणा आहे, गाय-बैल-वासरापासून मुंग्या -झाडे ही सारी एका ‘दडपून’ टाकणाऱया अजस्त्र बुलडोझरखाली येत चालल्याची ‘वैश्विक रुदनाची’ भावना आहे.

‘कासरा’ तसे पाहायला गेले तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर-नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत आहे. सरसकट सर्वच पातळीवर ‘सामान्यवाद’ रुजवत चाललेल्या एका राक्षसी वेगाने पसरत चाललेल्या ‘वावटळीत’ आपल्या माणूस म्हणून असण्याची, आपली मातीत खोल असलेली मुळे तपासून पाहणारी आणि कुठेही आक्रस्ताळी वा एकांगी न वाटणारी संयत धारदार कविता आहे.

आजची नवी भांडवली व्यवस्था कृषिजनसमूहाचे शोषण करत आहे. हेही कविता आवर्जून नोंदवते. हा कवी गाव, माती, गावगाडा या साऱयाचे वर्तमान आपल्या परीने तपासत, अन्वय लावत त्याची यथासांग चिकित्सा करतो. कृषिजन संस्कृतीच्या गाभ्यातील ताणताणाव या कवितेच्या केंद्रभागी आहेत. ही कविता आजच्या खेडय़ापाडय़ातील जगण्याला दिलेली तीव्र प्रतिक्रिया आहे. ती सखोल चिंतनगर्भ आहे. अत्यंत सहज-सुलभ वावरणारी लय आणि नव्या शब्दांची निर्मिती ही या कवितेची महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. आजच्या कृषिजन संस्कृतीचा विद्रूप चेहरा ही कविता अधोरेखित करते. म्हणून या कवितेचे मोल अधिक आहे. या कवितेत वाचणाऱयाला घेरून टाकत अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य आहे. हेच या कवितेचे बलस्थान आहे. अशा शब्दांत डॉ. राजन गवस या संग्रहाची पाठराखण करताना आपला मोलाचा अभिप्राय नोंदवताना ‘कासरा’ कवितासंग्रहातील कवितेला चिंतनगर्भ म्हणतात ते फार संयुक्तिक आहे.

एक संयत अस्वस्थता प्रेरित करण्याची क्षमता सदर संग्रहात दिसून येते. कृषिग्राम संस्कृतीतील नितळपण, निर्व्याजपण हरवत चालल्याची, एखाद्या कोवळ्या वासराच्या डोळ्यातले कारुण्य टिपणारी ही कविता निश्चितच वाचकाला अंतर्मुख करते हे मात्र नक्की. वर्तमान पडझडीच्या सद्यकाळात खूप काही पाहून आणि सोसून आलेली ही ‘निखळ’ कविता आविष्कार वाचकाला भावल्याशिवाय राहणार नाही.

 कासरा ( कवितासंग्रह)
 कवी ः ऐश्वर्य पाटेकर
 प्रकाशन ः पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
 पृष्ठे ः 128  मूल्य ः 250 रुपये