परीक्षण : सावत्रपणाच्या अंतर्बाह्य अनुभवाचा कल्लोळ

>>प्रमोद मुनघाटे

‘हि ल्लोळ हरवून आतबाहेरचा’ हा प्रज्ञा दया पवार यांचा सहावा कवितासंग्रह. ‘अंतःस्थ’ हा त्यांचा पहिला संग्रह 1993 मध्ये आला होता. पुढे त्यांचे ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’ (2002), ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’(2007), ‘आरपार लयीत प्राणांतिक’(2009) आणि ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ (2002) हे संग्रहही लोकप्रिय ठरले.

गेल्या तीन दशकात जग झपाटय़ाने बदलले आहे. हा झपाटा गेल्या शतकातील दोन महायुद्धांच्या परिणामांपेक्षा अधिक वेगवान आहे. त्यामुळे भौतिक जग पूर्वीसारखे उरले नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या व्यक्तीचा आकांत म्हणजे एडवर्ड मंचच्या चित्रातील आवाज नसलेली किंकाळीच आहे. खरे तर किंकाळीचे वर्णन करू शकणारी भाषाही सायबर युगातील चिन्हव्यवस्थेने जिरवून टाकली आहे. प्रज्ञा दया पवार या कवयित्रीच्या मनातील एरवीचा कल्लोळही आपला अर्थ हरवून बसला असावा; म्हणूनच त्या ‘हिल्लोळ’ असा शब्द वापरतात. पण तो हिल्लोळही हरवला आहे. ‘बुलडोझर’ कवितेत कवयित्री लिहिते, भोंग्यातून ऐकू येतेय ती लिपी कोणती?
कोणती ही अगम्य भाषा?
सगळ्याच वस्तूंची अदलाबदल करणारी
भोंगा कधीपासून झाला बुलडोझर
बुलडोझरला नेमकी कधी फुटली वाचा वाचाभंग करणारी
भाषा, लिपी आणि वाचा यापासून व्यक्ती जणू कायमची वंचित झाली आहे. व्यक्तीच्या आत आणि बाहेर असा कोणताच संवाद उरला नाही. व्यक्ती आणि समूह यांच्यातील संवादाच्या शक्यता तर गेल्या शतकातच संपल्या होत्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून कंठाशी येणारा हुंदकाही आता हरवून गेल्याचा अनुभव या संग्रहाच्या सर्वच कवितांमधून येतो. या मुक्या गोठलेपणाची विभागणी व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशीही करता येत नाही.

राष्ट्र आणि नागरिकत्व या संकल्पना जेव्हा धर्म आणि वर्णांच्या अफूत बुडवल्या जातात तेव्हा व्यक्ती आणि समाज यांचे समाजशास्त्रीय अस्तित्व उरत नाही. व्यक्ती-व्यक्तीतील किंवा समाजा-समाजातील संबंध हे दोन शत्रूराष्ट्रांतील संशयखोर संबंधामध्ये बदलतात. अशा अशांत वातावरणात दाभोळकर-पानसरे यांच्या हत्या होऊनही सार्वजनिक जीवनावर एक चिरस्थायी शांतता का पसरून राहते, असा प्रश्न या कवयित्रीला पडतो. म्हणून ती म्हणते, देश नावाच्या संकल्पनेचं लाल रसरशीत फळ
काही पुरुषांनी खाल्लं मग एका स्त्त्री दिलं
तिचं नाव बिल्किस बानो
हे स्त्रिये आम्हाला माफ कर

वर्तमानात निखळ व्यक्ती म्हणून अस्तित्व हरवलेल्या स्त्रीचे एक विकृत परिमाणही ही कवयित्री काही कवितांमधून नेमक्या प्रतिमांमधून व्यक्त करते. ‘स्त्रीवाद’ अशी राजकीय संज्ञासुद्धा गेल्या शतकात उदयास आली होती का, अशी शंका त्यामुळे येते. लैंगिक वासनादेखील भांडवली व्यवस्थेचा एक भाग बनतात तेव्हा, बाजारपेठेतील चलनासारखे स्त्रीत्वही गोठवले जाते. ‘पुनर्लेखन’ कवितेत कवयित्री म्हणते,
सनी लिओनी नाव असलेली स्त्री
मी असले तरी मी ती नाही
माझं नाव सांगताच मला न्याहाळणाऱया नजरा
तिच्यासाठी असतात या उघड सत्याने
माझा जीव भांडय़ात पडतो नि मला घायाळही करतो.
एक सेक्शुअल ऑब्जेक्ट बनून राहण्याचं
मुक्त मोकळं स्वातंत्र्य लिओनी जगते
स्त्रीत्वाच्या अशा विकृत आभासी भांडवली जगाला राष्ट्र, धर्म आणि जातीच्या सनातन तुरुंगांची जोड मिळते, तेव्हा स्त्री म्हणून जगण्याला पावलोपावली क्रौर्याशी सामना करावा लागतो. विशिष्ट जातीच्या बायांना पाहून, धडा शिकविण्यासाठी उद्दीपित होणारे शिस्न किंवा योनीत खुपसले जाणारे रॉड हेही भोग कोणत्या भाषेत व्यक्त करायचे की नुसता आवंढा गिळायचा? असेही प्रश्नही कवयित्री विचारते.

थोडक्यात, नव्वदोत्तर काळात जगण्यात वाटय़ाला आलेले परकेपण, भांडवली सत्तेत हरवलेला व्यक्तीचा आवाज, राष्ट्रवादी अतिरेकातून आलेला हिंस्त्र भवताल आणि परकोटीची हताशा अशा जाणिवा या संग्रहात प्रामुख्याने जाणवतात. जात, धर्म, आर्थिक किंवा स्त्राr-पुरुष विषमता असे प्रश्न, त्यासाठी उठणारे आवाज, सत्यासाठी व्याकुळ होणे आणि प्रसंगी बलिदान करणे हेही या कराल काळाने पचवले आहेत. कोणतीही दया-माया नसलेला हा काळाचा कॅनव्हॉस आहे. कवयित्रीला पिकासोचे ‘गार्निका’ आठवते. निरर्थक सर्जनाच्या व्यवहारात आपण घोस्ट रॉयटर्स म्हणून जगतो आहोत. ही विक्राळ यंत्रणा कवितेला निरुपद्रवी ठरवू पाहत आहे. अशा काळात आपण जिवाच्या कराराने कविता लिहिण्यावरचा विश्वास उडून जातो. पण आपली कविता ही शोकेसमध्ये सजवून ठेवलेल्या अत्तराच्या रिकाम्या बाटलीसारखी निरुपयोगी नसावी असा एक आशेचा सूर असणारा ‘हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ येणाऱया काळातील मौनाचा आवाज बनू पाहते.

[email protected]
हिल्लोळ हरवून आतबाहेरचा
 कवयित्री ः प्रज्ञा दया पवार
 प्रकाशक ः पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
 पृष्ठसंख्या ः 172  किंमत ः रु. 395/-