
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शिवसह्याद्री फाऊंडेशनतर्फे ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेचे यंदाचे 15 वे वर्ष असून वरळीच्या जांबोरी मैदानातून 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, आकर्षक गुढय़ा आणि विविध देखाव्यांसह शोभायात्रा निघेल. या वर्षी शोभायात्रेत ‘अभिजात’ मायमराठीचा जयघोष केला जाणार आहे.
यंदाच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा. शोभायात्रेत मराठीच्या प्रचारासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थी व महिलांना उपयुक्त अशी मराठी पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. शालेय मुलांनी अधिकाधिक मराठी वाचावे आणि लिहावे यासाठी प्रेरणादायी फलक तयार करण्यात येणार आहेत. हे फलक आणि घोषवाक्ये शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात येणार असून ‘मराठी वाचा, मराठी बोला, मराठी लिहा’ हा संदेश प्रभावीपणे देण्यात येणार आहे. तसेच वरळी विभागातील स्थानिक मराठी लेखक, कवी आणि पत्रकारांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
‘मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने आम्ही या शोभायात्रेत विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक देखावे सादर करणार आहोत’ असे सांगत विभागातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन शिवसह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय कदम यांनी केले.
संस्कृतीचा अनोखा संगम
शोभायात्रेत वारकरी भजनी मंडळांचा भक्तिमय गजर, महिला लेझिम पथक, साई पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक, ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य चित्ररथ, तसेच रामायणातील राम-सीता यांचे जीवन दर्शन घडवणारा देखावा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. यामुळे इतिहास, भक्ती आणि संस्कृती यांचा अनोखा संगम या शोभायात्रेत पाहायला मिळणार आहे.
वरळीचा परिसर दणाणून जाणार
यात्रेच्या आकर्षणात भर घालण्यासाठी तरुण-तरुणींनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात, फेटे परिधान करून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक भगव्या ध्वजांसह सहभागी होणार असून ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण वरळी परिसर दणाणून जाणार आहे. शोभायात्रेची सुरुवात ऐतिहासिक जांबोरी मैदान येथून सकाळी 8 सुरू होणार असून ती डॉ. जी. एम. भोसले मार्गावर निघेल.