
बापच मुलीवर अत्याचार करतो अशा बातम्या हल्ली आपल्याला ऐकायला मिळतात. एखादा बापच मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा, असा संताप अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केला. तसेच महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत, असे मतही त्यांनी मांडले.
खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्री अलका कुबल जळगावमध्ये उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अलका कुबल म्हणाल्या, पालकांनी प्रत्येक मुलाचा कल ओळखणे आवश्यक आहे. फक्त इंजिनीअर, डॉक्टर किंवा वकील बनणे हेच ध्येय नसावे. शेती, नर्सिंग, शिक्षण क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांतही मुले उजळू शकतात. याकडेही लक्ष द्यावे. मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून पालकांनी मुलांवर अपेक्षांचे ओझे टापू नये. कमी मार्क मिळाले तरी योग्य दिशा दिल्यास या मुलांचे यशस्वी करिअर घडू शकते, असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला.