शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) या गटातून मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळाला. दरम्यान, राज्य शासनाने मराठा समाजातील मुलांना ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्र देणे बंद केले. त्याऐवजी सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग अर्थात ‘एसईबीसी’ प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली. आता प्रवेश देणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विद्यार्थ्यांकडून ‘ईडब्ल्यूएस’ प्रमाणपत्राची सक्ती केली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले होते.
या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाला उच्च शिक्षणातील सुधारणेचा त्रिसूत्री कार्यक्रम विभागाला दिला.