मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही; फडणवीसांच्या शपथविधीपूर्वी मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा आणि मुख्यमंत्री कोण याचा तिढा सुटला आहे. आता गुरुवारी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. महायुती सरकारच्या या शपविधीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिला आहे. आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी हा इशारा दिला आहे.

फडणवीस आमचे शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो. महाराष्ट्रात आमची संस्कृती आहे. आम्ही विरोध पण करतो आणि मोठ्या मनाने शुभेच्छापण देतो. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी फडणवीस यांना दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी आपल्या आंदोलनाबाबतही घोषणा केली आहे.

आपण मराठा आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले होते. हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात होईल किंवा अंतरवालीमध्ये होईल असंही त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी आता या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सरकार स्थापनेनंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहेत. हीच आंदोलनाची पुढची दिशा असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. हे उपोषण आंतरवाली सराटीमध्ये होणार आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी कोणालाही सोडणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.