शंभुराज देसाई, शब्द पाळा अन्यथा तुमचाही कार्यक्रम करणार! मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा आरक्षणासाठी केलेल्या उपोषणाच्या चौथ्या टप्प्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेले राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आम्हाला सर्व मागण्या मान्य करणार असल्याचा शब्द दिला आहे. देसाई यांनी त्यांचा शब्द पाळावा नाहीतर मराठा समाजाला त्यांचाही कार्यक्रम करावा लागेल, असा कडक इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे कुणबी नोंदींचे काम बंद करण्यात आल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकार ओबीसी नेत्यांच्या दबावाखाली येऊन मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप केला. या अन्यायाला वाचा पह्डण्यासाठी 6 ते 13 जुलैपर्यंत मराठा समाज सर्व ताकद एकवटून सरकारला जागे करण्याचे काम करणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्याउपरही सरकार कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन पडून राहिले तर आम्ही विधानसभेला सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रकाश आंबेडकरांवर नाराज नाही

वंचित बहुजन आघाडीने आज सग्यासोयऱयांच्या संदर्भातील अध्यादेश तसेच कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी नेमकी आमच्या विरोधात भूमिका का घेतली हे माहिती नाही, परंतु माझी प्रकाश आंबेडकरांवर नाराजी नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

अशी होणार शांतता रॅली

मनोज जरांगे यांनी सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण मराठवाडय़ात शांतता रॅली काढण्याचे आवाहन केले आहे. हिंगोलीत या रॅलीचा प्रारंभ होणार असून समारोप छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
6 जुलै – हिंगोली
7 जुलै – परभणी
8 जुलै – नांदेड
9 जुलै – धाराशीव
10 जुलै – लातूर
11 जुलै – बीड
12 जुलै – जालना
13 जुलै – छत्रपती संभाजीनगर

कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयऱयांचा अध्यादेश रद्द करा! वंचित बहुजन आघाडीची मागणी

कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयऱयांचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने वंचित आघाडीने 11 ठराव मंजूर केले असून त्याचे फलक सर्व शहरांमध्ये लावण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. जात प्रमाणपत्र हा अधिकृत दस्तऐवज आहे. त्यात रक्ताच्या नातेवाईकांची जात प्रमाणपत्रे हा आवश्यक पुरावा असतो. या पुराव्यालाच नाकारण्याचे काम सगेसोयरे अध्यादेश करत असल्याचे वंचितने म्हटले आहे.

गद्दारीचा कलंक पुसण्यासाठीच शिंदेंनी मनोज जरांगेंना उभे केले! नवनाथ वाघमारे यांचा स्पष्ट आरोप

शिवसेना पह्डल्यानंतर लागलेला गद्दारीचा कलंक पुसण्यासाठीच एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे यांना उभे केल्याचा स्पष्ट आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण काढून त्यांना मराठय़ांना द्यायचे आहे, असेही ते म्हणाले. उपोषण सोडल्यानंतर प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आज सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आले होते. या वेळी ओबीसी कार्यकर्त्यांसमोर बोलताना नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षपाती असल्याचा आरोप केला. आमचा अभिवादन दौरा हा ओबीसी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी असल्याचेही ते म्हणाले.

मराठा आणि कुणबी वेगवेगळेच

या वेळी बोलताना प्रा. लक्ष्मण हाके यांनी मराठा आणि कुणबी हे वेगवेगळेच असल्याचा दावा केला. सर्वोच्च न्यायालयानेही यावर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सरकारने आमच्या ताटातले काढून दुसऱयाच्या ताटात वाढू नये, असा इशारा त्यांनी दिला. सरकारने जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, असेही प्रा. हाके म्हणाले.